Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

T20worldcupNewsUpdate : भारत – पाक सामन्यात भारतीय संघाला ऐतिहासिक फटका देत पाकिस्तानने असा मिळवला विजय !!

Spread the love

दुबई : देशभरातील क्रिकेट शौकिनांचे लक्ष वेधलेल्या भारत – पाक सामन्यात पाकिस्तानच्या संघाने भारतीय संघाने ठेवलेले १५२ धावांचे लक्ष भेदून टी-२० वर्ल्डकप २०२१ स्पर्धेत भारताला मात देऊन नवा इतिहास घडविला. भारताच्या पराभवावरून भारतीय संघावर सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. या रोमहर्षक सामन्यात बाबर आझमच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पाकिस्तान संघाने दुबईच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून पराभव केला. दरम्यान आतापर्यंत एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारतीय संघ कधीच पाकिस्तानकडून पराभूत झाला नव्हता.

या वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्ताने भारताला पहिल्यांदाच भारताला मात दिली आहे. पाकिस्तानचा कप्तान बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान पहिल्याच षटकात रोहित शर्मा, केएल राहुल हे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर विराटने किल्ला लढवला आणि त्याच्या अर्धशतकी योगदानामुळे भारताने पाकिस्तानला १५२ धावांचे आव्हान दिले.

आफ्रिदीला ठरला  सामनावीर

या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने धडकी भरवणारा स्पेल टाकला आणि रोहित, राहुल आणि विराटला तंबूत परतवून लावले . त्यानंतर भारताला दमदार उत्तर देत पाकिस्तानचे सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि कप्तान बाबर आझम यांनी धडाकेबाज १५२ धावांची भागीदारी करत संघाला सहज विजय मिळवून दिला. रिझवानने नाबाद ७९ तर बाबरने नाबाद ६८ धावांची खेळी केली. यावेळी आफ्रिदीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

भुवनेश्वरने भारतासाठी पहिले षटक टाकले. या षटकात पाकिस्तानने नाबाद १० धावा केल्या. पॉवरप्लेमध्ये भारताला विकेट मिळवण्यात अपयश आले तर ६ षटकात पाकिस्तानने बिनबाद ४३ धावा केल्या. पॉवरप्लेनंतर रिझवान आणि बाबरने आक्रमक खेळायला सुरुवात केली. १८व्या षटकात पाकिस्ताने विजयावर शिक्कामोर्तब केले. बाबरने ६ चौकार आणि २ षटकारांसह ६८ धावा, तर रिझवानने ६ चौकार आणि ३ षटकारांसह ७९ धावा केल्या.

भारताचा खेळ असा झाला !!

भारताकडून केएल राहुल आणि रोहित शर्मा हे सलामीवीर मैदानात उतरले आणि पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शाहीन आफ्रिदीने हिटमॅन रोहित शर्माला शून्यावर पायचीत पकडले. तर तिसऱ्या षटकात त्याने राहुलला क्लीन बोल्ड केले. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीने पॉवरप्लेचे शेवटचे षटक टाकले. या षटकात त्याने सूर्यकुमारला यष्टीपाठी झेलबाद केले. पाकिस्तानचा यष्टीरक्षक मोहम्मद रिझवानने याने हा झेल घेतला. ६ षटकात भारताने ३ बाद ३६ धावा केल्या.

या पडझडीनंतर विराट कोहली आणि ऋषभ पंतने भारतासाठी किल्ला लढवण्याचा प्रयत्न करून डाव सावरण्याच्या प्रयत्न केला. १२ व्या षटकात पंतने हसन अलीच्या चेंडूवर लागोपाठ २ षटकार खेचले. या षटकात विराट कोहली-ऋषभ पंतने अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. पुढच्याच षटकात पंतने आक्रमक अंदाजात शादाब खानच्या चेंडूवर मोठा फटका मारला पण तो झेलबाद झाला. पंतने २ चौकार आणि २ षटकारांसह ३९ धावा केल्या. १५ व्या षटकात भारताने शतक पूर्ण केले, तर १८ व्या षटकात विराटने आपले अर्धशतक पूर्ण केले. १९ व्या षटकात आफ्रिदीने विराटला बाद केले. विराटने ५ चौकार आणि एका षटकारासह ५७ धावा केल्या. २० षटकात भारताने ७ बाद १५१ धावा केल्या. हरीस रौफने पाकिस्तानसाठी टाकलेल्या शेवटच्या षटकात ७ धावा दिल्या. आफ्रिदीने ३१ धावांत ३, तर हसन अलीने ४४ धावांत २ बळी घेतले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!