Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

विरोधक पहिल्या पाच टप्प्यांमध्येच चारीमुंड्या चित , नरेंद्र मोदी यांची विरोधकांवर प्रखर टीका

Spread the love

लखनऊ/भोपाळ: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातल्या जनसभांमधून काँग्रेस आणि सपा-बसपा महागठबंधनवर निशाणा साधला. काँग्रेस नेत्यांनी कितीही यज्ञ केले, जानवं दाखवलं, इतकंच काय पोलिसांनाही भगवी वस्त्रं परिधान करण्यास लावली, तरीही भगव्या दहशतवाद्यांचं त्यांचं पाप धुतलं जाणार नाही, अशा शब्दांमध्ये मोदींनी काँग्रेसवर शरसंधान साधलं. मायावतींना मुलींची इतकीच चिंता असेल, तर त्यांनी अलवर प्रकरणानंतर राजस्थान सरकारला दिलेला पाठिंबा काढून घ्यावा, असं आव्हान पंतप्रधानांनी दिलं.

पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी हल्ला केल्यावर निर्दोष व्यक्तींना तुरुंगात टाकलं जायचं, असा गंभीर आरोप मोदींनी केला. ‘काँग्रेसनं हिंदू शब्द दहशतवादाशी जोडून महान परंपरेचा अपमान केला. मतपेढीच्या राजकारणासाठी गंभीर कट रचण्यात आला. मात्र आता त्यांना प्रत्युत्तर मिळतं आहे,’ असं मोदी म्हणाले. काँग्रेस नेते सॅम पित्रोडांच्या १९८४ मध्ये जे झालं ते झालं, या दंगलीवरील विधानाचाही मोदींनी समाचार घेतला. ‘खंडवाचे सुपुत्र असलेल्या किशोर कुमार यांच्या गाण्यांवर काँग्रेसनं आणीबाणीदरम्यान बंदी आणली. आता त्यांना याबद्दल विचारलं, तर म्हणतील जे झालं ते झालं. वायूगळती प्रकरणातल्या आरोपीला सरकारी विमानानं का पळवलं, त्यावरदेखील काँग्रेस हेच उत्तर देईल. १९८४  मध्ये झालेल्या दंगलीतील आरोपीकडे काँग्रेसनं पंजाबचं प्रभारीपद दिलं. लोकांनी याला विरोध करताच त्या व्यक्तीला मध्य प्रदेशचं मुख्यमंत्रीपद देण्यात आलं,’ असं म्हणत मोदींनी काँग्रेस नेतृत्वावर टीकेची झोड उठवली.

विरोधक पहिल्या पाच टप्प्यांमध्येच चारीमुंड्या चित झाले आहेत. त्यामुळेच ते प्रचंड गोंधळून गेले आहेत, असा टोला त्यांनी उत्तर प्रदेशातल्या कुशीनगर येथील जनसभेत लगावला. या सभेत मोदींनी आज सकाळी जम्मू-काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात दहशतवाद्यांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईचा संदर्भ दिला. ‘काश्मीरमध्ये काही दहशतवादी मारले गेल्याचं आज सकाळीच समजलं. आता काही लोकांचा प्रश्न आहे की मतदान सुरू असताना मोदींनी दहशतवाद्यांना का मारलं. दहशतवाद्यांना मारण्याआधीही जवानांनी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यायची का,’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काश्मीरमध्ये सतत स्वच्छता अभियान सुरू असतं. दर दोन-तीन दिवसांनी स्वच्छता होत असते. हे स्वच्छता अभियान राबवणं माझं काम आहे, अशा शब्दांत मोदींनी दहशतवाद्यांवरील कारवाईचा उल्लेख केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!