IndiaCrimeUpdate : व्वारे पट्ठ्या … लोकांना ईडीच्या नावाने धमकावणारा “गोडसे ” अखेर गजाआड

नवी दिल्ली : चित्रपट निर्मितीचा शौक पूर्ण करण्यासाठी त्यांनी चक्क केंद्रीय तपास यंत्रणा ED अर्थातच अंमलबजावणी संचालनालयाच्या नावाखाली बोगस नोटिसा देऊन अनेक उद्योजक आणि व्यावसायिकांकडून करोडो रुपये उकळणाऱ्या एका टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात दिल्ली पोलीस आणि ED ने संयुक्त कारवाई करत तीन आरोपींना गजाआड केले आहे. या प्रकरणी आरोपींची कसून चौकशी केली जात आहे.
या विषयी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि , संबंधित आरोपींनी अनेक व्यावसायिकांकडून लाखो आणि करोडो रुपये उकळून बेकायदेशीरपणे मिळवलेल्या या पैशाचा वापर चित्रपट निर्मितीसाठी करण्यात येत असल्याची माहितीही उघड झाली आहे. फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीचं नाव डॉ. संतोष राय उर्फ राजीव सिंह आहे. आरोपी राय हा ‘गोडसे’ नावाच्या चित्रपटात मुख्य अभिनेता, चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे.
या टोळीतील आरोपी शहरातील बड्या उद्योजक आणि व्यावसायिकाना मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे फोन करत आपण ईडीचे अधिकारी असल्याचं सांगत आणि ईडी मुख्यालयाच्या लँडलाईन क्रमांकाशी मिळत्या जुळत्या नंबरवरून व्यावसायिकांना धमकी देण्यात येत होती. या कार्यपद्धतीचा अवलंब करून आरोपींनी अनेक व्यावसायिकांना करोडो रुपयांना गंडा घातला आहे.