IndiaCrimeUpdate : चोरीच्या संशयावरून आदीवासी व्यक्तीला दिली अशी अघोरी शिक्षा !!

नीमच : मध्य प्रदेशच्या निमच जिल्ह्यातील जेतिया गावात चोरीच्या संशयावरून एका व्यक्तीला बेदम मारहाण करून त्याला पिकअप गाडीसोबत बांधून फरफटत नेण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यातच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. संतापजनक बाब म्हणजे आरोपींनी या धक्कादायक घटनेचा आणि क्रुरतेचा व्हिडिओ करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. दरम्यान, हे प्रकरण समोर आल्यानंतर आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मृताचे नाव कान्हा ऊर्फ कन्हैया भील (वय ४५ वर्षे) असून तो बाणदा गावचा रहिवासी होता.
जेतिया गावात घडलेल्या या घटनेत एका आदिवासी व्यक्तीला चोर असल्याच्या संशयातून काही लोकांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला पिकअप वाहनासोबत दोरीने बांधून फरफटत दूरपर्यंत नेले. पुन्हा त्याला मारहाण करून आरोपींनी पोलीस हेल्पलाईन नंबरवर फोन करून चोर पकडल्याचे सांगितले. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला जवळच्या आरोग्य केंद्रात नेले. जखमा जास्त असल्याने त्याला नीमच जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान आरोपींनी व्हायरल केलेल्या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. नीमचचे एसपी सूरज वर्मा यांनी याप्रकरणी ८ जणांविरोधात हत्या आणि एट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणातील मुख्य आरोपी महेंद्रसह आणखी चार जणांना अटक करण्यात आली आहे.