MaharashtraPoliticalUpdate : चर्चेतली बातमी : पवारांच्या मुख्यमंत्री भेटीनंतर राष्ट्रवादीच्या बैठका

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर शरद पवार १ जूनला राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक घेणार असल्याचे वृत्त आहे. आजारपणानंतर शरद पवारांनी भेटी गाठी आणि बैठकीचे सत्र सुरु केले आहे. याची करणे मात्र अद्याप अस्पष्ट आहेत . राज्यातील कोरोनाची स्थिती , आरक्षणाचा मुद्दा, पदोन्नती आरक्षण आणि चक्रीवादळ अशा अनेक मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये मविआ सरकारमध्येही अंतर्गत वाद सुरू असल्याचे चित्र आहे.
दरम्यान पदोन्नती मधील आरक्षणाच्या मुद्यावर काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर नाराज असून काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांनी या विषयावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टार्गेट केले असून याबाबतीत सरकारने काढलेला अध्यादेश रद्द करण्यासाठी आजच्या कॅबिनेट बैठकीत आपण आग्रह धरणार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे हा तणाव वाढण्याची चिंन्हे आहेत. या सव पार्श्वभूमीवर शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट नेमकी कोणत्या मुद्द्यावर होती. इतकेच नाहीतर शरद पवार हे राष्ट्रवादी नेत्यांच्या बैठकीत काय सूचना देतील हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत केलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी ही बैठक असून यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांचीही बैठक होणार असल्याची माहिती पक्षच्या नेत्यांकडून देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रास जाणवू लागल्याने लागोपाठ दोन शस्त्रक्रिया कराव्या लागल्या होत्या. ब्रीच कँडी रुग्णालयात या शस्त्रक्रिया झाल्या होत्या. त्यानंतर काही दिवस विश्रांती घेऊन शरद पवार पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी विविध प्रश्नांच्या अनुषंगाने केंद्र व राज्य सरकारशी पत्रव्यवहारही केला आहे. आपले प्रश्न घेऊन विविध शिष्टमंडळेही त्यांना भेटत आहेत. हा सर्व दिनक्रम सुरू असताना शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. पवार आजारपणातून बरे झाल्यानंतर प्रथमच मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले. ही नियमित भेट असली तरी राज्यातील गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता ही भेट महत्त्वाची ठरली आहे. त्यानंतर आता मंत्र्यांच्या बैठकीमुळे राजकीय चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत.