खून प्रकरणातील आरोपी अडीच वर्षानंतर गजाआड

औरंंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक पाहण्यासाठी गेलेल्या आशिष संजय साळवे (रा.क्रांतीचौक परिसर) या युवकाची हत्या करून फरार झालेल्या आरोपीस क्रांतीचौक पोलिसांनी अडीच वर्षानंतर गजाआड केले. नयन शैलेंद्र जाधव (वय २७, रा.रमानगर, क्रांतीचौक परिसर) असे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीचे नाव आहे.
१४ एप्रिल २०१८ रोजी आशिष साळवे हा आपल्या मित्रासोबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक पाहण्यासाठी गेला होता. क्रांतीचौक परिसरातील नुतन कॉलनी येथील एका स्टेजसमोर डिजेसमोर नाचण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर अविनाश गौतम जाधव, कुणाल गौतम जाधव व नयन जाधव यांनी धारदार चाकूने भोसकून आशिष साळवे याची हत्या केली होती. तेंव्हापासून नयन जाधव हा फरार होता. पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे, सहाय्यक आयुक्त विवेक सराफ, क्रांतीचौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक डॉ.गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गजानन सोनटक्के, सहाय्यक फौजदार संजय बनकर, जमादार जावेद पठाण आदींनी नयन जाधव याला सापळा रचून गजाआड केले.