अंत्यसंस्कारासाठी कोणीही पुढे येत नसल्याने मुलाचीही माघार , अखेर जिल्हा प्रशासनाने केले अंत्यसंस्कार ….

कोरोनाचा लोकांनी इतका धसका घेतला आहे कि , एखाद्याला कोरोनाचा संसर्ग झाला किंवा एखाद्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कोणीही कोणाच्या मदतीसाठी पुढे येताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर अशीच एक घटना उघड झाली आहे . त्याचे असे झाले कि , कुकडगाव (ता.परंडा, जि.उस्मानाबाद) येथील एका व्यक्तीचा तीन दिवसांपूर्वी उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालय येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. संबंधित व्यक्तीची करोना चाचणी निगेटिव्ह आली होती. मुंबई येथून आलेले हे कुटुंब क्वारंटाइन आहे. संबंधित व्यक्तीची पत्नी करोना पॉझिटिव्ह आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर गावात अंत्यसंस्कारासाठी प्रतिसाद न मिळाल्याने मुलाने मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देऊन त्याने प्रशासनाला अंत्यसंस्कार करण्याची विनंती केली. करोनामुळे लोकांमध्ये असलेल्या अनेक गैर समजुतीमुळे नात्यांचीही मोठी अडचण होत असल्याचे यानिमित्ताने दिसून आले आहे.
वास्तविक पाहता या तरुणाच्या वडिलांची प्रकृती दमा, कावीळ आदी आजाराने खालावली आणि त्यांना उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची माहिती परंडा येथे असलेल्या मुलाला देण्यात आली. मंगळवारी प्रशासनाच्या परवानगीनंतर मुलगा उस्मानाबादला गेला. त्याआधी त्याने गावाकडे संपर्क साधून अंत्यविधीच्या तयारीबद्दल कळविले, पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याने उस्मानाबादच्या आरोग्य प्रशासनाला मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत अंत्यविधी प्रशासनाच्या वतीने करण्याची विनंती केली. जिल्हा रुग्णालयाने पोलिसांमार्फत उस्मानाबाद नगरपालिकेला पत्र दिले. पोलिसांच्या मागणीवरून संबंधित व्यक्तीवर उस्मानाबाद नगर पालिकेने कपिलधार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले, यावर सामाजिक प्रबोधनाची गरज आहे.