MaharashtraCoronaUpdate : राज्यात आणखी १३१ पोलिसांना कोरोना तर दोन पोलिसांचा मृत्यू

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा कहर चालूच असून गेल्या २४ तासांत आणखी १३१ पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दोन पोलिसांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे. संपूर्ण राज्यात आतापर्यंत २०९५ पोलिस कोरोनाबाधित झाले आहेत. यात २३६ पोलिस अधिकारी आणि १८५९ पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण २२ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ८९७ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यात प्रत्येक तासाला कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. यात कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलिसांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होऊ लागला आहे. विशेष म्हणजे कोरोनाविरुद्ध युद्ध लढणाऱ्या कोरोना वीरांना या धोकादायक विषाणूंची लागण होत असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या १५२९ कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यत कोरोनामुळे २५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. कोविड-19 च्या प्रादुर्भावानंतर पहिल्यांदा बीएमसीने ही आकडेवारी जाहीर केली आहे.
राज्यात बुधवारी एका दिवसातील सर्वाधिक मृत्यू नोंदवण्यात आले. १०५ मृत्यूंसह मृतांची एकूण संख्या १८९७ वर गेली आहे. २१९० नव्या रुग्णांसह एकूण कोरोनाबाधितांचा आकडा रुग्णांची एकूण ५६,९४८ वर गेला. राज्यात ९६४ कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले असून बरे होणाऱ्यांची संख्या १७,९१८ झाली आहे. राज्यात ३७,१७५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईत दिवसभरात १००२ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ही ३२ हजार ९७४ वर पोहोचली आहे. तर बुधवारी दिवसभरात ३९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबळींची संख्या १०६५ वर पोहोचली आहे.