विनाशिधापत्रिका धारकांसाठी महत्वाची माहिती , ३१ मे पर्यंत करा अर्ज आणि असे मिळवा दोन महिन्यांचे धान्य….

आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेजअंतर्गत केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल, विस्थापित मजुर, रोजंदारीवरील मजुर जे राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत किंवा कोणत्याही राज्य योजनेअंतर्गत समाविष्ट नाही तसेच ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही अशा व्यक्तींना मे आणि जून या दोन महिन्यांचे प्रती व्यक्ती प्रतिमाह 5 किलो तांदुळ वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
हे धान्य वितरण विनाशिधापत्रिका लाभार्थ्यांना ऑफलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. अशा लाभार्थ्यांकडून आधार कार्ड क्रमांक किंवा कोणतेही शासकीय ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्याची पुराव्यादाखल स्वतंत्र नोंद करण्यात येईल. मे व जून महिन्यातील धान्य वितरण जुन महिन्यात सुरू होणार आहे.
औरंगाबाद शहरासाठी वार्ड निहाय एकुण 115 अन्नधान्य वितरण केंद्र (स्वस्त धान्य दुकान) निश्चित करण्यात आलेले- असून त्याबाबत स्वतंत्रपणे आदेश पारित करण्यात आले आहे. एकूण 52 हजार 160 लाभार्थ्यांना मोफत तांदुळ वितरीत करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित मंडळ अधिकारी, तलाठी, वाडॅ अधिकारी कार्यालय व अन्नधान्य वितरण केंद्र यांच्यामार्फत विनाशिधापत्रिका धारकांना विहीत नमुन्यातील अर्ज वाटप केले जाणार आहेत. विनाशिधापत्रिका धारकांनी विहीत नमुन्यात भरलेले अर्ज नजीकच्या अन्नधान्य वितरण केंद्रात 31 मे पर्यंत जमा करावयाचे आहेत. ज्या अन्नधान्य वितरण् केंद्रामध्ये विनाशिधापत्रिका धारक अर्ज भरुन देतील त्यांचे अन्नधान्य वितरण केंद्रातुन संबंधित अन्नधान्याचे वितरण करण्यात येईल. अनन धान्य घेताना सदर अर्जाची पोहच सोबत आणणे आवश्यक आहे. तरी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी आपले अर्ज 31 मे पर्यंत जमा करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.