विरोधी पक्षाचे १७ आमदार प्रवेशासाठी भाजपच्या दारात

‘राज्यातील विरोधी पक्षांचे १७ आमदार सध्या आमच्याकडे प्रवेशासाठी रांगेत उभे आहेत. येत्या ३१ तारखेला त्यातील चार जण भोकरदन येथे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत,’ असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांनी केला आहे. ज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय कलगीतुऱ्याच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यांनी यावेळी जोरदार टीका केली. अजित पवार यांच्याजवळ आता कोणताच झेंडा शिल्लक राहिलेला नाही. त्यांच्या झेंड्याचा दांडाच आमच्या हातात आला आहे. त्यांच्या जवळचे लोक भगव्या झेंड्याकडे आले आहेत. आम्ही खूप दिवसांपासून त्यांना भगव्याबद्दल सांगत होतो. पण ऐकत नव्हते. आता लोकांनीच भगवा कसा असतो ते दाखवून दिलं,’ असं दानवे म्हणाले. ‘विरोधी पक्षाचे अनेक आमदार प्रवेशासाठी इच्छुक आहेत. पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह हे राष्ट्रवादीच्या सभेला उपस्थित नव्हते यावरून काय ते समजा,’ असंही ते म्हणाले.
शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे का असं विचारलं असता, ‘राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्यात ज्यांची नावं असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल होणारच,’ असं ते म्हणाले. भाजपवाले राष्ट्रवादीच्या नेत्यांना पक्षात घेऊन निवडणुका लढवणार आणि उद्याच्या मंत्रिमंडळात त्यांनाच घेणार असल्यानं भविष्यात राज्यात राष्ट्रवादीचीच सत्ता असेल, या सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचाही दानवे यांनी समाचार घेतला. ‘विधानपरिषदेचे विद्यमान विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे पूर्वी भाजपमध्ये होते आणि सध्या राष्ट्रवादीच्या यात्रेचे नेतृत्व करणारे अमोल कोल्हे पूर्वी शिवसेनेत होते, हे ताईंनी लक्षात घ्यावं,’ असं दानवे म्हणाले.
‘राज्यातील विधानसभा निवडणूक भाजप-सेना एकत्र लढणार आहे. जागावाटपाचा फार्म्युला ठरलेला आहे. तिकिटे जाहीर झाली की सगळ्यांना कळेल, असं ते म्हणाले. जालना शहरातील महा जनादेश यात्रेत भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा हे सहभागी होणार आहेत,’ अशी माहितीही त्यांनी दिली.