व्हिडीओ व्हायरल होताच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या सेल्फीवर विरोधकांचे टीकास्त्र

कोल्हापूर आणि सांगलीच्या पूरस्थितीचा आढावा घेताना राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी हसत दिलेला सेल्फी व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. महाजन यांचा बोटीतून जाताना सेल्फी व्हिडिओ ट्रोल झाला आहे. आता विरोधकांनी महाजनांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पूरग्रस्त जिल्ह्याच्या पाहणीसाठी निघालेले गिरीश महाजन चक्क सेल्फीसाठी पोझ देत, हातवारे करत जणू पर्यटन सहलीलाच निघाले की काय, अशा आविर्भावात फिरताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ‘ट्विटर’च्या माध्यमातून महाजन यांनी खडे बोल सुनावले आहेत. सत्ताधाऱ्यांनी असंवेदनशीलतेचा कळस गाठलाय! ‘त्या’ लेकराच्या मृतदेहाचे चित्र आठवले तर मनाला चटका लागून डोळ्यात टचकन पाणी येतं. मंत्री महोदय मात्र सेल्फी काढण्यात मग्न आहेत. यांना लाज कशी वाटत नाही. मुख्यमंत्री या संवेदनशील वागण्याची दखल घेणार का?, असा सवाल धनंजय मुंडेंनी उपस्थित केला आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनीही साधला सरकारवर निशाणा
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. सांगली-सातारा-कोल्हापुरात भीषण पूरस्थिती आहे, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. जनावरं नदीत सोडून दिली आहेत, घरं उद्ध्वस्त झाली आहेत. अशा परिस्थितीत मंत्री सेल्फी काढत असल्यास आपलं दुर्दैवच आहे. आजही पालकमंत्री हजर नाहीत. पुनर्वसन कार्य ज्यांच्याकडे आहे ते उपस्थित नाहीत. एनडीआरएफच्या 3 ते 4 बोटी आताशा आल्या आहेत. सरकारच्या ढिसाळ कारभारानं नागरिक वैतागले आहेत. मंत्र्यांनी मदत करण्याऐवजी सेल्फी काढून अशा प्रकारच्या जाहिराती करणं दुर्दैवी आहे. हेलिकॉप्टरमधून फिरणं ही कोल्हापूर आणि सांगलीकरांना आवडणारी गोष्ट नाही. सांगलीतून अनेकांचे फोन आले आहेत, आम्हाला मदत पोहोचवा. जिल्हाधिकारी काहीच प्रतिक्रिया देत नाहीत. निषेध करावा तेवढा थोडा आहे. मुख्यमंत्र्यांनी खाली उतरून लोकांना भेटले असते तर लोकांना दिलासा मिळाला असता.