Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : सुषमा अंधारे प्रकरणात संजय शिरसाटांना क्लिनचीट? रुपाली चाकणकर यांनी दावा फेटाळला

Spread the love

मुंबई : विनयभंग, बदनामी आणि अब्रू नुकसानीचा दावा सुषमा अंधारे यांनी या तक्रारीतून केला होता. याप्रकरणातून संजय शिरसाटांना क्लिनचीट मिळाली असल्याचे वृत्त समोर येत आहे. मात्र, हा दावा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी फेटाळून लावला आहे. दरम्यान यासंबंधीचे पत्र सुषमा अंधारे यांना चार दिवसांपूर्वीच पाठवण्यात आले आहे. संजय शिरसाटांनी टीका केली तेव्हा सुषमा अंधारे तिथे उपस्थित नव्हत्या. त्यामुळे समोर व्यक्ती नसल्यामुळे विनयभंग होत नाही, असा निष्कर्ष काढून शिरसाटांना क्लिनचीट दिली असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान यावर बोलताना रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे की , “सुषमा अंधारेंनी पोलीस तक्रार दिली तेव्हा त्याची नोंद झाली नाही. त्यामुळे त्यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली. राज्य महिला आयोगाकडे तक्रार आल्यानंतर संबंधित पोलीस विभागाला तपास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. पोलिसांचा अहवाल राज्य महिला आयोगाला प्राप्त झाला. या अहवालात तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, यासंदर्भातील तपास करत असताना कायदेशीर अडचणी येत आहे. या तपासात सरकारी वकिलांची मदत घेऊन त्यांचा अभिप्राय घेऊन तपास करू. इतकंच अहवालातून सांगण्यात आलं आहे. संजय शिरसाटांना क्लीनचिट मिळाल्याचा अहवाल राज्य महिला आयोगाला प्राप्त झालेला नाही”, असंही चाकणकरांनी स्पष्ट केलं.

नेमकं प्रकरण काय ?

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या एका सभेत बोलताना संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली होती. “ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. सत्तार भाऊ माझेच भाऊ, भुमरे भाऊ माझेच भाऊ, काय-काय लफडी केली आहे, तिलाच माहित. अरे पण तू आहे तरी कोण? आम्ही आमची 38 वर्षे शिवसेनेसाठी घालवली. आता तुम्ही येऊन आम्हाला मार्गदर्शन करताय आणि काही लोक टाळ्या वाजवत आहेत, अशी उद्विग्न प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी व्यक्त केली होती.

याप्रकरणी सुषमा अंधारे यांनी शिरसाट यांच्याविरोधात महिला आयोगासह परळी पोलिसात तक्रार दाखल केली होती. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये हे वक्तव्य करण्यात आल्याने बीड पोलिसांनी ही तक्रार छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांकडे वर्ग केली होती. त्यानंतर डीसीपी दर्जाच्या एका अधिकाऱ्याकडून या तक्रार अर्जाची चौकशी करण्यात आली. मात्र संजय शिरसाट यांनी जेव्हा वक्तव्य केलं त्यावेळी अंधारे या त्या ठिकाणी नव्हत्या. घटनास्थळी व्यक्ती नसल्याने विनयभंग होत नसल्याचा निकष पोलिसांकडून काढण्यात आला आहे. त्या प्रकरणी अंधारे यांना पत्र पाठवून पोलिसांकडून कळवण्यात देखील आले आहे.

छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून सुरु होता तपास

सुषमा अंधारे यांच्यावर भाषणामध्ये अपशब्द वापरल्याच्या प्रकरणील छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून तपास सुरु होता. यासाठी डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यासह उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या महिला अधिकाऱ्यांची तपासासाठी नेमणूक करण्यात आली होती. तसेच यूट्यूबवर उपलब्ध असलेलं संजय शिरसाट यांचं भाषण तपासण्यात आले होते. तसेच तक्रारीमध्ये पुरवलेल्या भाषणाचीही तपासणी करण्यात आली. तर ‘लफडं’ हा शब्द कायद्याच्या चौकटीत बसतो का याचीही चौकशी करण्यात आली. तर विनयभंग करण्यात आल्याच्या आरोपाची देखील चौकशी करण्यात आली.

शिरसाट यांची प्रतिक्रिया…

दरम्यान यावर आमदार संजय शिरसाट यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की , “मी असले कोणतेही वक्तव्य केले नव्हते. पण एखाद्या गोष्टीचा बाऊ करून मला बदनाम करण्याचा हा प्रकार होता. अंधारे कोर्टात देखील गेल्या होत्या आणि त्यांना न्यायालयाने देखील फटकारले आहे. मी वारंवार सांगितले होते की, मी काहीही चुकीचे वक्तव्य केलेले नव्हते. एखाद्याला बदनाम करण्याचा हा प्रकार आहे. आता तरी त्यांनी समजावे, तसेच जी काही कायदेशीर लढाई लढाईची आहे ती लढणार असल्याचे देखील शिरसाट म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!