Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : महाराष्ट्रातील बहुचर्चित सत्ता संघर्षाचा उद्या निकाल येण्याची शक्यता …

Spread the love

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील बहुचर्चित सत्ता संघर्षावरचा राखून ठेवलेला निकाल उद्या जाहीर करण्यात येत असल्याची माहिती देशाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी दिली असल्याची माहिती लाईव्ह लॉ या संकेतस्थळाने दिली आहे.


लाईव्ह लॉने दिलेल्या माहितीनुसार , सर्वोच्च न्यायालयात समलिंगी विवाह कायद्याप्रकरणी सुनावणी सुरू होती. यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी उद्या होणाऱ्या महत्त्वाच्या सुनावण्यांसदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, “उद्या दोन घटनापीठातील महत्त्वाच्या प्रकरणी निकाल द्यायचा आहे. समलिंगी विवाहाप्रकरणी सुरू असलेली सुनावणी उद्या दुपारी १२ वाजता करण्यात यावी. कारण, उद्या सकाळीच महत्त्वाच्या सुनावण्या लिस्टिंग आहेत”, असे सरन्यायाधीश यांनी ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांना सांगितले.

न्यायालयाने राखून ठेवला होता निकाल…

विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करून भाजपासोबत सत्ता स्थापन केली. यामुळे राज्यात सत्तासंघर्षाचा पेच निर्माण झाला. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात वादळी सुनावणी झाली आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांच्याही वकिलांनी जोरदार युक्तीवाद करत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाप्रकरणी सुनावणी मार्च महिन्यात पूर्ण झाली होती. मात्र, न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. या निकालाबाबत गेल्या दोन दिवसांपासून अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर, हा निकाल उद्या लागण्याची शक्यता आहे.

सरन्यायाधीशांच्या बोलण्यातून झाला खुलासा ..

या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती एमआर शाह, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमार झाली होती. या घटनापीठातील दुसरे ज्येष्ठ न्यायमूर्ती एम.शाह १५ मे रोजी निवृत्त होणार आहेत, त्यामुळे याप्रकरणी येत्या दोन दिवसात निकाल येईल, अशी कायदे तज्ज्ञांमध्ये चर्चा होती. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून या निकालावरून चर्चा झडत होत्या. अखेर, सरन्यायाधीश यांनीच याप्रकरणी खुलासा केला असल्याने उद्या या प्रकरणाचा पडदा उघडला जाईल.

विषयाची पार्श्वभूमी

जून महिन्यात गेल्यावर्षी राज्यसभेची मतदानप्रक्रिया पार पडल्यानंतर त्याच रात्री शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे २५ आमदारांसह सुरतला पसार झाले होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर एका पाठोपाठ एक ठाकरेंच्या गटात असणारे तब्बल ४० आमदार गुवाहाटीला जाऊन शिंदे गटाला जाऊन मिळाले. दरम्यानच्या काळात शिंदे गटाने भाजपासोबत हातमिळवणी करून महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता उलथवून टाकली. परिणामी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताच राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले.

दरम्यान एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह गेलेल्या आमदारांच्या विरोधात उद्धव ठाकरे आणि शिंदे सर्वोच्च न्यायालयात गेले. फुटलेल्या एकूण आमदारांपैकी १६ आमदारांना अपात्र ठरवण्यात यावे अशी याचिका उद्धव ठाकरे गटाकडून यावेळी करण्यात आली होती. याप्रकरणी उद्या निकाल लागणार असून याकडे केवळ राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागलेले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेला महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणाला उद्या ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!