Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MharashtraPoliticalUpdate : आम्ही एकत्र आहोत , उद्या राहुल गांधी यांना भेटणार : शरद पवार

Spread the love

पुणे : शरद पवार यांनी अदानी प्रकरणात जेपीसीवरून घेतलेल्या वेगळ्या भूमिकेमुळे चर्चेत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करून काँग्रेस आणि शिवसेनेसोबतच आपण राहणार असल्याचे संकेत देत आपल्या विरोधातील चर्चेला पूर्णविराम दिला आहे. दरम्यान विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी उचललेले हे ऐतिहासिक पाऊल आहे. सध्या घटनात्मक संस्थांवर आक्रमण होत असून, त्याविरोधात आम्ही एकत्रितपणे लढा देऊ असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.


काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाकडून जेपीसीची मागणी करण्यात आली होती. मात्र शरद पवार यांनी जेपीसीची आवश्यकता नसल्याचे म्हटले होते. यावरून चर्चेला उधाण आले होते, तसेच राहुल गांधी यांच्या नेतृत्वात झालेल्या विरोधी पक्षाच्या बैठकीला देखील शरद पवार अनुपस्थित होते. त्यामुळे राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का ? अशा वावड्या उठल्या होत्या त्यावर आता शरद पवार यांनी स्वत:च स्पष्टीकरण दिले आहे.

‘आम्ही सर्व एकत्र’

आज शरद पावार पुणे दौऱ्यावर असताना , राज्यातले सरकार अस्थिर आहे का? राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का असे प्रश्न त्यांना विचारले असता, राहूल गांधींसोबत झालेल्या विरोधी पक्षाच्या बैठकीला मला ही बोलवले होते, पण मला इथे काही कामे होती. मी उद्या दिल्लीला जाऊन त्यांची भेट घेणार आहे, आम्ही सगळे त्यांच्यासोबतच आहेत असे शरद पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान दुसरीकडे अजित पवार भाजपसोबत जाणार का ? या प्रश्नावर मात्र शरद पवार यांनी बोलणे टाळल्याने पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

उद्धव ठाकरे -के. सी. वेणुगोपाळ भेट आज

काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाळ हे गुरुवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मुंबईत येणार आहेत. राहुल गांधी वा काँग्रेसने सावरकरांचा मुद्दा उपस्थित करू नये, अशी शिवसेनेची भूमिका आहे. अर्थात, राहुल गांधी ती मान्य करतील का, याबद्दल राज्यातील काँग्रेस नेते साशंक आहेत. मात्र, शरद पवार- उद्धव ठाकरे यांची झालेली भेट आणि काँग्रेसचे सरचिटणीस वेणुगोपाळ यांच्या गुरुवारच्या मुंबई दौऱ्यातून महाविकास आघाडी बळकटीकरणास मदतच होईल, असे आघाडीच्या नेत्यांचे मत आहे.

महाविकास आघाडीत मतभेद नाहीत- पटोले

महाविकास आघाडीत विविध मुद्दय़ांवरून कटुता निर्माण झाल्याचे चित्र असले तरी महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, असा निर्वाळा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. महाविकास आघाडी भक्कम असून आमच्यात कसलेही मतभेद नाहीत, असा निर्वाळा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. महाविकास आघाडीच्या राज्यभर वज्रमूठ सभा होत आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील यशस्वी सभेनंतर आता १६ एप्रिलला नागपुरात सभा होत आहे. आघाडीच्या वाढत्या प्रभावामुळे विरोधक धास्तावले आहेत, त्यामुळेच आघाडीत मतभेद असल्याचा अपप्रचार केला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या भेटीचा वेगळा अर्थ काढण्याची काहीच गरज नाही, असेही ते म्हणाले.

मुंबईतील सभेत पवारही राहणार उपस्थित

महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा १ मे रोजी मुंबईत होणार असल्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. शिवाजी पार्क मैदानात होणाऱ्या या सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मार्गदर्शन करणार असल्याचे सांगण्यात आले. पवार-ठाकरे यांच्यातील चर्चेत पवारांनी सहभागी होण्याची विनंती ठाकरे यांनी केली होती.

‘आघाडीत बिघाड निर्माण करणारी विधाने टाळावीत’; अजित पवार यांचा सल्ला

दरम्यान महाविकास आघाडीचा घटक असलेल्या पक्षांच्या नेत्यांनी पक्षांतर्गत प्रश्न आपापल्या पातळीवर सोडवावेत. मात्र आघाडी म्हणून जनतेला सामोरे जाताना आघाडीत अंतर निर्माण होणारी विधाने टाळावीत, असा सल्ला विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला आहे. याबाबत बोलताना पवार म्हणाले, आम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून एकत्र आलो आहोत. आघाडीतील घटक पक्षांचे काही प्रश्न असतील तर त्यांनी त्यांच्या पातळीवर सोडवावेत. त्यात इतर पक्षाला सूचना करण्याचा तसेच नाक खुपसायचाही अधिकार नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!