Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ShivsenaNewsUpdate : एक नजर : निवडणूक आयोगाच्या निकालावर कोण काय म्हणाले ?

Spread the love

मुंबई : निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राज्यात राजकीय भूकंप आला असून भाजपने या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले आहे तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. यावर आपली प्रतिक्रिया देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी  भाजपसह विरोधकांवर हल्लाबोल केला. तसेच   निवडणूक आयोगाच्या या निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. तर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार करीत आत्मचिंतन  करण्याचा सल्ला दिला आहे.


प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की ,  आजचा निर्णय हा अनपेक्षित आहे. जवळपास सहा महिने ही लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. जोपर्यंत हा निकाल लागत नाही तोवर निवडणूक आयोगाने निकाल देऊ नये असं आम्ही म्हणत होतो. पक्ष कुणाचा हे केवळ आणि केवळ निवडून आलेल्या आमदार, खासदारांच्या जोरावर ठरवलं तर कुणीही धनाढ्य माणूस या आमदार, खासदारांना विकत घेऊन पक्षाचा सर्वेसर्वा , मुख्यमंत्री, पंतप्रधान होऊ शकतो.

खरा  धनुष्यबाण माझ्याकडे…

ठाकरे पुढे म्हणाले की , उद्या आमचे मशाल चिन्हही ते आमचे  घेतील. मशाल आता पेटलीय. जेवढा अन्याय कराल त्या प्रत्येक अन्यायाचा बदला महाराष्ट्रातील जनता घेतल्याशिवाय राहणार नाही. आजच्या दिवशी त्यांनी चोरलेला   धनुष्यबाण कागदावरचा  आहे आणि खरा  धनुष्यबाण माझ्याकडे आहे. अनेकांना वाटले असेल की शिवसेना संपली पण शिवसेना लेचीपेची नाही. पहिल्या दिवसापासून आमच्याकडे शिवसेना नव्हती. आमच्याकडे धनुष्यबाण आहे शिवसेना प्रमुखांच्या देव्हाऱ्यात आहे. त्याची पूजा आजही आम्ही करतो आणि तो पुजेतच राहणार असल्याचं ठामपणे उद्ध ठाकरे यांनी सांगितले. विजयाशिवाय आपण माघारी परतायचे  नाही. ही चोरी काहीकाळ पचली असे  वाटत असेल पण त्यांना शिवसेना प्रमुखांचा फोटो, नाव, धनुष्यबाण चोरावे  लागले. पण असे चोर कधीच मर्दानगी दाखवू शकत नाही. नामर्दांनो ही चोरी पचणार नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

निवडणूक आयोगाने शेण खाल्लं आहे….

निवडणूक आयोगाने शेण खाल्लं आहे. तर कागदपत्र देण्याचा खटाटोप कशाला करायला लावला ?  केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी थोतांड केलं आहे. त्यांनी जेजे मागितलं ते त्यांना फॉरमॅटमध्ये आम्ही दिलं. परंतु आयुक्तांना जे करायचं ते त्यांनी केलंच. आज निवडणूक आयुक्तांनी जे शेण खाल्लं आहे ते खायचंच होतं तर एवढा खटोटोप का? असा प्रश्न ठाकरेंनी उपस्थित केला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरु असताना पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून घोषणा करावी की ७५ वर्षांचं स्वातंत्र्य संपलंय आणि देशातली लोकशाही संपवून आम्ही बेबंदशाहीला सुरुवात केली आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. तसंच या निर्णयाविरोधात आपण सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. एकनाथ शिंदे शिवसेना भवनावर दावा करणार? या प्रश्नावर शिवसेना भवनावर दावा सांगायला मोगलाई लागली का? असा प्रश्न उपस्थित केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रत्युत्तर

उद्धव ठाकरेंच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘हा केविलवाणा प्रयत्न आहे. सहानुभूती मिळवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. आपल्या पक्षाकडे असलेले कार्यकर्ते दुसरीकडे जाऊ नये, म्हणून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न आहे. निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था स्वतंत्र यंत्रणा आहे, तुम्ही त्यांच्यावर एवढ्या खालच्या पातळीचा आरोप करू शकत नाही. तुम्ही लोकशाहीला घातक आहात, तुमच्या अशा वक्तव्यांमुळे लोकशाहीचा खून होतोय. यापुढे तरी तुमच्यात सुधारणा घडू द्या,’ असं एकनाथ शिंदे म्हणाले.

‘आम्हाला चोर म्हणाले. आम्ही ५० आमदार चोर. १३ खासदार चोर शेकडो, हजारो नगरसेवक चोर. लाखो शिवसैनिक कार्यकर्ते चोर. लाखो लोकांना तुम्ही चोर बनवताय आणि तुम्ही एकटे साव. कधीतरी आत्मपरीक्षण करणार का नाही. जेवढे लोक तुम्हाला सोडून गेले ते गुन्हेगार आणि तुम्ही बरोबर. हे कसे  होऊ शकते ? याचा विचार करा तुम्ही. स्वत: मध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. आत्मचिंतन करा,’ असा सल्ला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिला. ‘निवडणूक आयोगाने बहुमताच्या बाजूने निर्णय दिला आहे. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे. त्यांच्या बाजूने निकाल दिला असता म्हणजे लोकशाही जिवंत राहिली असती. त्यांच्या विरोधात निकाल गेला म्हणजे लोकशाही संपली. कांग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कडे गहाण ठेवलेला धनुष्यबाण मी परत आणला’, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

शरद पवार यांचा सल्ला …

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या निकालावर त्यांचे मत व्यक्त केले आहे. ‘हा निवडणूक आयोगाचा निकाल आहे, एकदा निकाल लागल्यावर त्यावर चर्चा करता येत नाही. तो स्वीकारायचा आणि नवीन चिन्ह घ्यायचे . त्याचा काही फार परिणाम होत नसतो. काँग्रेसमध्ये एकदा इंदिरा गांधी असताना हा वाद झाला. काँग्रेसचं गाय-वासरू चिन्ह होतं, पण त्यांनी पंजा घेतला, पण त्यामुळे काही फरक पडला नाही. लोकांनी ते स्वीकारलं. आताही फरक पडणार नाही, कारी दिवस चर्चा होत राहील, नंतर लोक विसरून जातील,’ असं म्हणत शरद पवार यांनी निवडणूक आयोगाचा निर्णय स्वीकारण्याचा सल्ला उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

राज ठाकरे यांची प्रतिक्रिया

‘अखेर सत्याचा विजय झाला. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा हा विजय आहे. बाळासाहेबांचा विचार आणि आम्ही घेतलेल्या निर्णयासोबत एकरूप झालेले आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि असंख्य लाखो शिवसैनिकांचा हा विजय आहे. हा लोकशाहीचा विजय आहे’, असं मुख्यमंत्री म्हणाले. या निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी बाळासाहेबांचा फोटो असलेला एक व्हिडिओ ट्वीटरवर शेअर केला आहे. ‘बाळासाहेबांनी दिलेला ‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं….’, असं कॅप्शन राज ठाकरे यांनी या ट्वीटला दिलं आहे. ‘नाव आणि पैसा. पैसा येतो, पैसा जातो, पुन्हा येतो… पण एकदा नाव गेलं की परत येत नाही. ते येऊ शकत नाही, काळ्या बाजारात सुद्धा मिळायचं नाही. म्हणून नावाला जपा, नाव मोठं करा.’ असा बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजातला व्हिडिओ राज ठाकरेंनी शेअर केला आहे.

रामाचा धनुष्यबाण रावणाला…: संजय राऊत

यावरून टीका करताना संजय राऊत यांनी म्हटले आहे की ,“हवे तसे निकाल देण्यात येत आहेत. तीन महिन्यांपासून स्क्रिप्ट तयार आहे. अधिक खोके आणि भरवसा दिल्यानंतर शिवसेनेत फाटफूट घडवून आणली. त्यांना काही करुन बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना नष्ट करुन बाजार बुणग्यांच्या हातात पक्ष देणार होता. मोदी-शाहा यांच्या भाजपाने ते करुन दाखवलं, पण महाराष्ट्र सुड घेतल्याशिवाय राहणार नाही. बाळासाहेब ठाकरेंनी रक्त आणि घाम गाळून शिवसेनेची बीज रोवली आणि आमच्यासारख्या अनेक पिढ्या उभ्या केल्या, ती शिंदेंची कशी होऊ शकते ? ”

महाराष्ट्रातील शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या पाठीशी : अजित पवार

“मला अतिशय अनपेक्षित निकाल आला आहे. उद्धव ठाकरेंनी मागणी केली होती, सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाने २१ फेब्रुवारीपासून दोघांचं मत ऐकणार, असं असताना ऐवढी घाई का केली. निवडणूक आयोगाने निर्णय दिला, तरी उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात जातील. न्याय नाही मिळाला तर सर्वोच्च न्यायालयात जाता येत. महाराष्ट्रातील शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभा राहिल,” असा विश्वास विरोधी पक्षनेते अजित पवारांनी व्यक्त केला.

शिवसेनेला ठाकरेंकडून कोणीच वेगळं करू शकत नाही : बाळासाहेब थोरात

निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे तो लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. शिवसेनेला ठाकरेंपासून कोणीच वेगंळ करू शकत नाही. शिवसेना आणि ठाकरे हे वेगळं समीकरण आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला असला तरी जनता उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निर्णय देईल. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे, त्यांनी योग्य निर्णय दिला पाहिजे होता. परंतु, त्यांनी एकतर्फी निर्णय दिलाय. भाजपची ही हुकूमशाही खपवून घेतली जाणार नाही, जनता याचं निक्कीच उत्तर देईल, असे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिनंदन

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर वाटचाल करीत हिंदूत्त्व आणि सत्यासाठी संघर्ष करणार्‍या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्याबद्दल मी त्यांचे आणि राज्यातील तमाम शिवसैनिकांचे मनापासून अभिनंदन करतो. ही आनंदाची गोष्ट आहे.आम्ही पहिल्यापासून सांगत होतो, खरी शिवसेना हीच आहे. कारण शिवसेना ही विचारांची शिवसेना आहे. त्यामुळे तो विचार पुढे नेहण्याचं काम एकनाथ शिंदे करत आहेत. त्यामुळे कुणीही शिवसेनेवर खासगी मालमत्ता म्हणून अधिकार सांगू शकणार नाहीत.आज निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णायावर शिक्कामोर्तब होता. आम्हाला याचा विश्वास होता. याचं कारण, यापूर्वीच्या सर्व निर्णायमध्ये निवडणूक आयोगानं पक्षातील फुटीवर असेच निर्णय दिले आहेत. आमदार आणि खासदार यांची संख्या लक्षात घेऊनच निर्णय झालेला आहे. कारण, एखादा पक्ष मतदारांच्या आधारावर असते, तो आमदार खासदारांवर असते, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!