MumbaiNewsUpdate : मुंबईत १९९३ सारखे बॉम्ब स्फोट होणार, पोलिसांना फोन करणारा गजाआड

मुंबई : येत्या दोन महिन्यांत मुंबईत १९९३ सारखे बॉम्ब स्फोट होणार, अशी धमकी देणारा फोन मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आल्यानंतर पोलिसांनी एका व्यक्तीला मालंडमधून उचलले असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे . मुंबईतील माहीम , भेंडी बाजार, नागपाडामध्ये हे बॉम्बस्फोट होतील असा दावा या फोनवर करण्यात आला असल्याचे वृत्त आहे.
उपलब्ध माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला काल एका व्यक्तीने फोन करून पुढील दोन महिन्यांतच मुंबईत १९९३ सारखे स्फोट होणार असल्याचा दावा केला. धमकी देणाऱ्याने सांगितले की १९९३ साली मुंबईत दंगल उसळली होती. तशीच दंगल आताही होईल. एवढेच नाहीतर मुंबईतही दिल्लीत घडले तसे निर्भया प्रकरण घडेल. मुंबईत बॉम्बस्फोट, दंगली घडवण्यासाठी दुसऱ्या राज्यातून लोक आले असून यामागे एका काँग्रेसच्या आमदाराचा हात असल्याचा दावाही या व्यक्तीने केला आहे.
दरम्यान मुंबई एटीएस , मुंबई क्राईम ब्रांच आणि सीआययूची टीमने या आरोपीचा शोध घेऊन एटीएसने आरोपीला मुंबईतील मालाड परिसरातून ताब्यात घेतले . सध्या या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे.