Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : मोठी बातमी : समेद शिखरजीबाबत अखेर सरकारने घेतला हा निर्णय …

Spread the love

नवी दिल्ली : जैन धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या समेद शिखरजी पर्वत क्षेत्राला आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेले पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याच्या विरोधात जैन समाजाची तीव्र भावना लक्षात घेऊन  अखेर आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितले की, येथील पर्यटन, इको-टुरिझम उपक्रमांवर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे. तसेच पारसनाथ परिसरात दारू विक्री, मोठ्या आवाजात गाणे, मांसविक्रीवर बंदी घालण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. या निर्णयानंतर जैन समाजाने आनंद व्यक्त करत सरकारचे आभार मानले आहेत.


केंद्र सरकारने समेद शिखरजी पर्वत क्षेत्राला आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेले पर्यटन स्थळ म्हणून घोषित केल्यानंतर जैन समाजाने या निर्णयाच्या विरोधात देशभरातून आंदोलन सुरु केले होते. झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यातील पारसनाथच्या डोंगरावर असलेल्या समेद शिखरजीला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याचा निर्णय मागे घेण्याची त्यांची मागणी करण्यात येत होती. कारण तिथे मांस आणि दारू विकली जात आहे. याबाबत जैन समाजाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पर्यटन मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी जैन समाजाच्या धार्मिक भावनांची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन दिले.

जैन समाजाने आंदोलन संपवले…

दरम्यान पारसनाथ प्रकरणी केंद्र सरकारने समिती स्थापन केली आहे. याबाबत राज्य सरकारने जैन समाजातील दोन सदस्यांचा समितीमध्ये समावेश करावा, असे सांगितले असून  स्थानिक आदिवासी समुदायातील एक सदस्य देखील समाविष्ट करावा  आणि २०१९ च्या अधिसूचनेवर राज्याने कार्यवाही करावी, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. जैन समाजाचा विरोध लक्षात घेऊन पर्यटन, इको-टुरिझम उपक्रमांवर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयानंतर जैन समाजाचे आंदोलन संपुष्टात आले आहे. पालीताना जैन तीर्थक्षेत्राचे प्रमुख म्हणाले की, आज त्यांनी भूपेंद्र यादव यांची भेट घेतली असून  त्यानंतर सर्व समस्या दूर झाल्या आहेत. आमची मागणी मान्य करण्यात आली आहे.

कोणत्या गोष्टींवर बंदी आहे?

याबाबतचे संपूर्ण निवेदनही केंद्रीय मंत्र्यांनी सोशल मीडियावर टाकले असून, त्यात पारसनाथ पर्वतीय प्रदेशात अमली पदार्थ आणि सर्व नशा करणे, मोठ्या आवाजात संगीत वाजवणे, लाऊडस्पीकरचा वापर करणे, निसर्गाला हानी पोहोचवणे, काम करणे, पाळीव प्राणी आणणे या सर्व बाबींना मज्जाव करण्यात आला आहे. तसेच  कॅम्पिंग आणि ट्रेकिंगला परवानगी देण्यात येणार नाही असे नमूद करण्यात आले असून या सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण ?

खरं तर, केंद्र सरकारने २०१९ मध्ये समेद शिखरजी हे इको-टूरिझम डेस्टिनेशन म्हणून घोषित करण्याची घोषणा केली होती. याची शिफारस झारखंड सरकारने केली होती. त्यानंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये राज्य सरकारने याबाबत अधिसूचना जारी केली आणि समेद शिखरजी हे पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. यादरम्यान पर्यटनस्थळाच्या आजूबाजूला दारू आणि मांसाची दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली, त्यानंतर संपूर्ण वादाला सुरुवात झाली आणि जैन समाजाने आंदोलन सुरू केले.  समेद शिखरजी हे जैन समाजाचे पवित्र स्थान म्हणून मान्यता आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!