Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PuneNewsUpdate : मी कुणालाही घाबरत नाही. हिंमत असेल तर समोरुन या, चंद्रकांत पाटील यांचे आव्हान …

Spread the love

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात राज्यपाल आणि भाजप नेत्यांकडून केलेल्या वादग्रस्त विधानांवरून संताप व्यक्त केला जात असतानाच राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी देणगी मागून म्हणजेच भीक मागून शाळा चालवल्याचे वादग्रस्त विधान केले होते. दरम्यान भाजपमधील नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वारंवार वादग्रस्त विधाने केली जात आहेत. असे असताना त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. याचा राग मनात धरून काही कार्यकर्त्यांनी चिंचवड येथे चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकली.


चंद्रकांत पाटील यांनी या घटनेवर  संताप व्यक्त केला. मी कुणालाही घाबरत नाही. हिंमत असेल तर समोरुन या, पोलीस बाजूला करतो, अशी आक्रमक प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी या घटनेनंतर नोंदवली. पुण्याचे पालकमंत्री असलेले चंद्रकांत पाटील चिंचवडमधील मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी आले होते. तेथे हा प्रकार घडला. यावर, मी कार्यक्रमाला चाललो आहे. मी सर्व कार्यक्रम करणार आहे. मी कुणाला घाबरत नाही. असा भ्याडपणे हल्ला करणे चुकीचे आहे. हिंमत असेल तर समोरुन या. सर्व पोलिस डिपार्टमेंट बाजूला करतो, असे आव्हान चंद्रकांत पाटील यांनी दिले. चंद्रकांत पाटील यांच्यावर समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केल्याचे समोर आले आहे.

भाजप नेते चंद्रकांत पाटील पिंपरी चिंचवड येथून एका कार्यक्रमातून बाहेर येत असताना अचानक एका व्यक्तीने शाईफेक केली. यावेळी चंद्रकांत पाटील जागेवर धडपडले यावेळी आजूबाजूच्यांनी पकडले. या घटनेत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. शाई फेकणाऱ्याचे मनोज गरबडे असे नाव आहे. तो आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता म्हणून पिंपरी-चिंचवड परिसरात परिचित आहे.

कालपासून अनेक संघटनांनी आंदोलनाची हाक दिली होती. त्यामुळे पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चंद्रकांत पाटील आज पिंपरी चिंचवड येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते, यावेळी एका व्यक्तीने चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केली. यामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण झाले होते.

ही झुंडशाही महाराष्ट्र शासन सहन करणार नाही

अशाप्रकारे पराचा कावळा करणे, तीन-तीनवेळा स्पष्टीकरण दिल्यानंतर, दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही असा प्रकार होणे हे भ्याडपणाचे आहे. ही झुंडशाही आहे. ही झुंडशाही महाराष्ट्र शासन सहन करणार नाही. याचे जे काही आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाहतील. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना खुली छुट दिली असती तर काय झाले असते. मात्र ही आमची संस्कृती नाही. शब्दाला शब्दाने टक्कर देता येते. गिरणी कामगारांचा मुलगा या स्टेजपर्यंत जाणे सरंजामी लोकांना झेपत नाही. त्यामुळे हे भ्याड हल्ले चालले आहेत, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.

दरम्यान, उद्यापासून पोलिस प्रोटेक्शनही नसेल, हिंमत असेल तर समोर या. हे चुकीचे पायंडे पडलेले आहेत. पोलिसांना दोष देण्याचे कारण नाही. पोलिसांनी कुणाकुणावर लक्ष द्यायचे. कार्यकर्ता कोण आणि बदमाश कोण हे कळणार कसे, अशी विचारणा करत, देवेंद्र फडणवीसांना सांगितले आहे की, कुणावरही कारवाई करु नका. मी सर्व कार्यक्रमाला जाणार आहे. बघू कोण काय करतंय, या समोर. ही झुंडशाही आहे, लोकशाही नाही, या शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी सुनावले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!