MaharashtraKarnatakBorderDispute : फडणवीस म्हणाले गृहमंत्र्यांना मी सीमा वादाविषयी बोललो , अमित शाह यात निश्चितपणे लक्ष घालतील…

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी गृहमंत्र्यांनी लक्ष घालावे, अशी विनंती आपण गृहमंत्री अमित शाहा यांच्याकडे केली असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. ते म्हणाले की , केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी आपण फोनवरून चर्चा केली असून सीमाप्रश्नावर अलीकडच्या काळात घडलेली संपूर्ण परिस्थिती त्यांच्यासमोर मांडली आहे. विनाकारण महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ले योग्य नाही, हेही त्यांच्या लक्षात आणून दिले आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी माझा फोनवरून झालेला संवादही त्यांच्या कानावर घातला आहे.
दरम्यान, सीमावादावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केले आहे. तरीही गृहमंत्री अमित शाह यांनी यामध्ये लक्ष घालावे. त्यांनीही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना स्पष्टपणे सांगावे, अशी विनंती मी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केली आहे. अमित शाह यात निश्चितपणे लक्ष घालतील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशीही मी बोललो आहे. ट्रकवरील हल्ल्याच्या प्रकरणात त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. बोम्मईंनी याबाबतीत कोणालाही पाठिशी घालणार नसल्याचे म्हटले आहे. हा संपूर्ण विषय मी स्वत: देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या कानावर टाकला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला जात आहे की नाही हे मी पाहणार आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.