ShraddhaWalkarMurderCase : आफताब पूनावाला याला घेऊन जाणाऱ्या पोलिस व्हॅनवर हल्ला…

नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावाला याला घेऊन जाणाऱ्या पोलिस व्हॅनवर हल्ला करण्यात आला आहे. रोहिणीतील एफएसएल बाहेर हा हल्ला झाला. हल्लेखोरांनी तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी काही लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे.
दरम्यान आरोपी आफताब सुरक्षित असल्याचे पोलिसांनी सांगितले. आफताबच्या जेल व्हॅनवर हल्ला करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे लोक हिंदू सेना या संघटनेशी संबंधित असल्याचा त्यांचा दावा आहे. पॉलीग्राफ चाचणीनंतर पोलिस व्हॅन पश्चिम दिल्लीच्या रोहिणी येथील न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेतून पूनावाला याला तुरुंगात घेऊन जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.या हल्ल्यात काही हल्लेखोर जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
आफताब पूनावाला याच्यावर आरोप आहेत की त्याने लिव्ह-इन-रिलेशनशिप असलेल्या पार्टनरचा गळा दाबून खून केला. आणि नंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून जवळपास तीन आठवडे घरातील फ्रीजमध्ये ठेवले होते. मृतदेहाचे हे तुकडे तो रात्री दिल्ली-एनसीआरच्या वेगवेगळ्या भागात फेकून देत असे. तब्बल सहा महिन्यांनंतर ही बाब समोर आली आहे.