Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PuneNewsUpdate : प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन, बहुआयामी अभिनेता गेला …

Spread the love

पुणे : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले आहे. ते ७७ वर्षांचे होते. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेल्या १५ दिवसांहून अधिक काळापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, परंतु त्यांची प्रकृती खालावत गेली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विक्रम गोखले यांच्या निधनाची माहिती रुग्णालय प्रशासनाने पत्रकार परिषद घेऊन दिली.


पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे विक्रम गोखले यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार असून आज सायंकाळी ६ वाजता वैंकुठभूमी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. विक्रम गोखले यांना घरातूनच अभिनयाचा वारसा मिळाला होता. त्यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या अभिनेत्री होत्या. तर त्यांच्या आजी कमलाबाई गोखले पुर्वीच्या कमलाबाई कामत या पहिल्या बाल-अभिनेत्री होत्या. १९१३ मध्ये दुर्गाबाईंनी दादासाहेब फाळके यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या ‘मोहिनी भस्मासुर’ नावाच्या चित्रपटात पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका साकारली होती. विक्रम गोखले यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनी ७१ हून जास्त हिंदी-मराठी चित्रपटांतून भूमिका केल्या होत्या. विक्रम गोखले यांच्या पत्‍नीचे नाव वृषाली आहे.

बहुआयामी अभिनेता

विक्रम गोखले मालिका,नाटक आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात कार्यरत होते. विक्रम गोखले यांनी इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले होते. संजय लीला भन्साळी यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात तो ऐश्वर्याच्या वडिलांच्या भूमिकेत दिसले होते. याशिवाय ते ‘भूल भुलैया’, ‘दिल से’, ‘दे दना दान’, ‘हिचकी’, ‘निकम्मा’, ‘अग्निपथ’, ‘मिशन मंगल’ या हिंदी चित्रपटात त्यांनी काम केले होते. भिंगरी, माहेरची साडी, लपंडाव, वासुदेव बळवंत फडके, सिद्धान्त हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन देखील केले आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आघात’ हा चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अनुमती’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. विक्रम गोखले यांची महत्त्वाची भूमिका असलेला ‘गोदावरी’ हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित झाला.

गाजलेले नाटक  ‘बॅरिस्टर’

विक्रम गोखलेंनी आपल्या आयुष्यात अनेक भूमिका केल्या पण त्यांची खरी ओळख आहे ती ‘बॅरिस्टर’. जयवंत दळवी लिखित हे नाटक मराठी नाटकांमधील एक दर्जेदार नाटक म्हणून मानले जाते. मानवी नातेसंबंधांची अनोखी बाजू या नाटकाने मांडली. बॅरिस्टर या नाटकात विक्रम गोखले आणि त्यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनी एकत्र काम केले होते. याशिवाय कथा, कमला, के दिल अभी भरा नही, छुपे रुस्तम, नकळत सारे घडले, दुसरा सामना,सरगम, स्वामी अशा अनेक नाटकात त्यांनी काम केले होते. मात्र घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकातील अभिनय संन्यास घेतला होता.

बऱ्याच वर्षांनंतर मालिकेतून केलं होतं कमबॅक

विक्रम गोखले यांनी टेलिव्हिजनमध्येही एक वेगळी ओळख निर्माण केली होती. १९८९ ते १९९१ या काळात दूरदर्शनवर चाललेल्या ‘उडान’ या प्रसिद्ध मालिकेतही त्यांनी काम केले होते. याशिवाय त्यांनी अग्निहोत्र, या सुखानों या, संजीवनी आणि सिंहासन या मालिकेत काम केले होते. अग्निहोत्री मालिकेत विक्रम गोखलेंनी मोरेश्वर गोखलेंचे पात्र साकारले होते. त्यांची ही भूमिका खूप लोकप्रिय झाली होती. या मालिकेनंतर अनेक वर्षांनंतर ते अलीकडेच ते छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत दिसले होते. विक्रम गोखलेंनी मालिकेत गुरु पंडित मुकूल नारायण यांचे पात्र साकारले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!