PrakashAmbedkarNewsUpdate : शिवसेनेसोबतच्या संभाव्य युतीवर प्रकाश आंबेडकरांनी दिली प्रतिक्रिया …

मुंबई : चार दिवसांपूर्वी एका अराजकीय कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर या सभेत उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकरांना एकत्र येण्याची जी साद घातली त्यावर प्रकाश आंबेडकरांनी उत्तर दिले आहे. आम्ही काँग्रेस आणि शिवसेनेला युतीचा प्रस्ताव दिला होता परंतु त्यावर अद्याप उत्तर आले नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज वंचित बहूजन आघाडीची आज दादरमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर त्यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले कि, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम्ही काँग्रेस आणि शिवसेनेला युतीचा प्रस्ताव दिला होता. मात्र, अधिकृतरित्या दोघांकडून आम्हाला काहीही उत्तर मिळालेले नाही. निश्चितपणे उद्धव ठाकरेंबरोबर एक कार्यक्रम झाला होता. मात्र, तो अराजकीय होता. आता ज्या ग्रामंपचायतीच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुकात आम्ही स्वत:चे पॅनल उभे करून लढत आहोत, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.
दरम्यान, यापूर्वी प्रबोधनकार डॉटकॉम या वेबसाईटच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनीही युतीचे संकेत दिले होते. “राज्यात निवडणुका कधी लागू होणार? यावर सर्व अवलंबून आहे. ताबोडतोब निवडणुका जाहीर झाल्या तर आम्ही ताबोडतोब एकत्र येऊ, नंतर निवडणुका जाहीर झाल्या तर आम्ही नंतर एकत्र येऊ”, असे ते म्हणाले होते.