DevendraFadanvisNewsUpdate : देवेंद्र फडणवीस यांचे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना प्रत्यूत्तर …

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना खोचक शब्दांत टोला लगावला आहे. तसेच, यावेळी बोलताना फडणवीसांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनाही प्रत्यूत्तर दिले आहे.
फडणवीस यावेळी म्हणाले की, सीमाप्रश्नावर सर्वोच्च न्यायालय योग्य निर्णय घेईल याची आम्हाला अपेक्षा आहे. सर्वोच्च न्यायालयापेक्षा कुणीही मोठे नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्रीही मोठे नाहीत किंवा इतर कुणीही मोठे नाही. त्यामुळे त्यांनी काहीही दावा ठोकला, तरी महाराष्ट्रातलं एकही गाव जाणार नाही. आमचा सीमाभाग आम्हाला परत मिळेल ही मला अपेक्षा आहे. मी कुठलंही चिथावणीखोर वक्तव्य केलेलं नाही. मी एवढंच सांगितलं की बेळगाव, कारवार, निपाणीसह इतर गावांवर आम्ही दावा सांगितला आहे. तो दावा काही आज सांगितलेला नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयात त्यासाठी भांडत आहोत. ती भूमिका मी मांडली. त्या मागणीला चिथावणीखोर म्हणणं चुकीचं आहे.
उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, माझा उद्धव ठाकरेंना सवाल आहे की आमच्यापेक्षा जास्त काळ कर्नाटक, महाराष्ट्र आणि केंद्रात काँग्रेस आणि मित्रपक्षांचं सरकार होतं. मग तेव्हा प्रश्न सुटला का? त्यामुळे बोलताना प्रत्येकानं विचार करून बोललं पाहिजे. शेवटी वेगवेगळी सरकारं कर्नाटकमध्ये आपण पाहिली. त्यांनी सातत्याने तीच भूमिका ठेवली आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या सरकारांनीही तीच भूमिका ठेवली आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात पक्षाचा वाद सीमावादात आपण कधीही आणला नाही. आताही कुणी आणू नये. त्यामुळे सीमेबाबतचा आपला वाद खिळखिळा होईल.
उदयनराजेंच्या पत्रामुळे हे खडबडून जागे झाले…
“छत्रपती उदयनराजे यांनी पत्र लिहिल्यानंतर शरद पवारांच्या लक्षात आलं की आपल्यासमोर घटना घडली आणि आपण त्यावर कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही. उदयनराजेंनी लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया आज दिली. शरद पवारांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर उद्धव ठाकरेंना प्रतिक्रिया द्यावीच लागते. त्यानुसार त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आता त्याला राजकीय रंग कसा देता येईल? याचा प्रयत्न सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज उभ्या भारताचं दैवत आहेत. त्यामुळे त्याबद्दल कुठला वादही होऊ शकत नाही. त्यावर कुणी राजकाऱण करणं हेही योग्य होणार नाही. आज हे उदयनराजेंच्या पत्रामुळे खडबडून जागे झाले आहेत”, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.