WorldNewsUpdate : इंडोनेशियालाभूकंपाचा मोठा धक्का , ४६ ठार , ७०० हून अधिक जखमी

जावा : इंडोनेशियालाभूकंपाचा मोठा धक्का बसला आहे. जावा बेटावर सोमवारी झालेल्या भूकंपात तब्बल ४६ जणांचा मृत्य़ू झाला असून ७०० जण जखमी झाले आहेत. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने दिलेल्या माहितीनुसार, ५.४-रिश्टर स्केलचा हा भूकंप पश्चिम जावा प्रांतातील सियांजूर भागात झाला. सियांजूर जिल्ह्याच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी घरांसह अनेक इमारतींचे मोठे नुकसान झाल्य़ाचे म्हटले आहे.
दक्षिण जकार्ता येथील कर्मचारी विदी प्रिमधनिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, “भूकंपाचे धक्के खूप तीव्र जाणवले. माझ्या सहकाऱ्यांनी आणि मी नवव्या मजल्यावरील आपत्कालीन पायऱ्यांवरून कार्यालयातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.” सियांजूर प्रशासनाचे प्रमुख हरमन सुहरमन म्हणाले, “मला आता मिळालेल्या माहितीवरून, एका रुग्णालयात सुमारे २० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर कमीतकमी ३०० लोकांवर उपचार सुरू आहेत.
Government officials say death toll in Indonesia earthquake rises to 46; about 700 injured, reports AP
— Press Trust of India (@PTI_News) November 21, 2022
दरम्यान इंडोनेशिया, २७ कोटींहून अधिक लोकांचा विशाल द्वीपसमूह असून भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक आणि त्सुनामी यांनी वारंवार प्रभावित होतो. या वर्षी फेब्रुवारीमध्ये पश्चिम सुमात्रा प्रांतात ६.२ तीव्रतेच्या भूकंपात किमान २५ लोकांचा मृत्यू झाला होता आणि ४६० हून अधिक जण जखमी झाले होते. जानेवारी २०२१ मध्ये, पश्चिम सुलावेसी प्रांतात ६.२ तीव्रतेचा भूकंप झाला, १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि ६,५०० जखमी झाले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे