MumbaiNewsUpdate : दोन नातवांनी गाजवली सभा , एकाने केले प्रबोधन तर दुसऱ्याने ओढले आसूड …

मुंबई : शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर एका वेबसाईटच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले होते या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे थेट नाव न घेता चौफेर फटकेबाजी करीत लोकशाही वाचविण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांना एकत्र येण्याचे आवाहन केले .
दादरच्या शिवाजी मंदिरमध्ये आयोजित ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या वेबसाईटच्या लोकार्पण सोहळ्यात हे दोन्हीही नेते बोलत होते. यानिमित्ताने बोलताना ठाकरे म्हणाले की , “प्रकाशजी आता आपण एकत्र आलो आहोत, ते काम आपल्याला करावेच लागेल. आतापर्यंत आम्ही बाबासाहेब आणि बाळासाहेब यांच्या फोटोंना अभिवादन करायचो आता दोन नातू एकत्र आले आहे. कुटुंब एकत्र आले आहे. आपल्या दोघांचेही वैचारिक व्यासपीठ एकच आहे. दोन्ही विचारांचे वारसे घेऊन आपण पुढे चाललो आहोत. परंतु जर आपण एकत्र आलो नाही तर आपल्याला आजोबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही.
प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले दोन धर्म …
यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मनुस्मृतीमध्ये, आपण मनूच्या कायद्यामध्ये अडकून पडणार आहोत की नवे काही घडवणार आहोत याचा विचार केला पाहिजे. “जो वारीला जातोय त्याच्यामध्ये ही भेदाभेदीची संस्कृती येणार नाही, कारण सर्वजण समान आहेत अशी त्यामागे भावना आहे. समाजव्यवस्थेमध्ये असलेलं बंड म्हणजे ७०० वर्षांपूर्वी सुरू झालेली वारी. चांगल्या भाषेमध्ये मांडणी करायचे म्हटले तर वैदिक धर्म म्हणजे विधवेचे मुंडण करणारा धर्म तर संताचा धर्म म्हणजे तिचा पुनर्विवाह होय. यापैकी योग्य तो एक विचार पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. आता वैदिक धर्म की वारकरी धर्म निवडण्याची वेळ आली आहे. धर्मनिरपेक्षता हा शब्द घटनेमध्ये नाही. त्याला बंदिस्त करता येत नाही. पीढी बदलत जाते तसा विचार बदलतोय, तसा या शब्दाचा अर्थ बदलतोय. प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य आहे पण राज्याला धर्म राहिलेला नाही, तो बारकाईने लक्षात घेतला पाहिजे.”
लोकशाही पाहीजे की हुकुमशाही हे ठरवले पाहीजे…
दरम्यान , प्रबोधनकारांनी जातीच्या नावावर असणाऱ्या समाजव्यवस्थेवर आसूड ओढला, तो नाकारला, समता बंधूभाव आणि एकमेकांवर आपुलकी निर्माण कशी होईल यावर लिखान केले. आताच्या काळात धर्माचे भांडण सुरू झालेले नाही तर लोकशाही विरुद्ध हुकूमशाही असे भांडण सुरु आहे. राजकीय पक्ष म्हणून आम्ही भूमिका घेऊ, मात्र मतदारांनी काय पाहिजे हे ठरवले पाहिजे. इथल्या प्रत्येक माणसाने लोकशाही पाहीजे की हुकुमशाही हे ठरवले पाहीजे असे प्रतिपादन प्रकाश आंबेडकर यांनी केले.
आपले कोणत्या धर्माशी भांडण नव्हते, धर्मांनी सांगितलेल्या सामजिक व्यवस्थेशी भांडण आहे. जात या नावाचा सुद्धा एक देश आहे हे लक्षात घ्या. आपण ज्यावेळेस प्रबोधनकार वाचायला घेऊ तेव्हा कळेल की जात कशी ओढलेली आहे. आणि मग समता कशी येईल हे कळते, असे आंबेडकर म्हणाले. संस्कृती आणि भाषे मुळे समता येते असे ते म्हणाले.
जात नावाची व्यवस्था हा एक देश बनला आहे असे सांगून प्रकाश आंबेडकर म्हणाले की, उत्तर भारतामध्ये खाप म्हणजे जात पंचायत. देशात आता या खप पंचायतीचा पुरस्कार करण्याचा विचार पुढे येतोय. मग आपण नेमकं कुणाला पुढे नेतोय. आपण इतर धर्मामध्ये लोकशाही नाही असे म्हणतोय पण वैदिक धर्मात हुकूमशाहीच आहे.
उद्धव ठाकरे यांचे फटकारे
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, प्रबोधनकार यांच्या विचारांच्या मुशीतून आम्ही तयार झालो. माणुसकी हा सगळ्यात मोठा धर्म आहे. काही आजोबा आता बोलत आहेत, त्यांचे नातू काय बोलतात माहीत नाही. वाट दाखवणारे महत्वाचे वाट लावणारे नव्हे. मुखवटा लावुन राज्य करत आहेत, तोडा फोडा आणि राज्य करा, हे सध्या सुरू आहे. बाळासाहेबांनी कधीही कोणाला जात विचारली नाही.
“स्वातंत्र्य अबाधीत ठेवण्यासाठी जे प्रयत्न करतील त्यांच्यासोबत आम्ही जायला तयार आहोत. केंद्राच्या गुलामीत राज्य नाही. राज्य आणि केंद्राला समान अधिकार आहेत. सगळे माझ्याच बुडाखाली पाहिजे, मलाच पाहिजे या हव्यासापोटी सत्ता काबीज केली जात आहे. राज्यघटना पायदळी तुडवून सत्ता पाहजे यांना पहिले खाली खेचले पाहिजे. याबरोबरच सत्ता पिपासू लोकांना सत्तेतून खाली खेचा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना केले.
लोकशाही पायदळी तुडवून सत्ता मिळवणाऱ्यांना खाली खेचा…
सद्य परिस्थितीवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “सध्याची परिस्थिती पाहिली तर आपल्या देशाची वाटचाल हुकुमशहाच्या दिशेने चालली आहे. इंग्रजांची निती होती तशी आज परिस्थिती निर्माण झाली आहे. जाती- धर्माच्या भिंती उभा करण्याचं काम सध्या सुरू आहे. वाटेल त्या मार्गाने सत्ता मिळवण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे या सत्ताधाऱ्यांना खाली खेचले पाहिजे. लोकशाही पायदळी तुडवून सत्ता मिळवणाऱ्यांना खाली खेचा.”
“न्याय व्यवस्थेवर आता प्रश्न चिन्ह निर्माण केले जात आहेत. न्यायमुर्ती म्हणून सध्या जे बसले आहेत ते कसे आले आहेत? कायदा मंत्री ज्या प्रकारे बोलतात ते त्यांचं वैयक्तीक मत आहे का? ते स्पष्ट केलं पाहिजे. त्यांचा स्वभाव आहे की पिल्लू सोडायचं, ते मोठ झालं की मग पालकत्व स्वीकाराच, असा टोला यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला. एखाद्या ठिकाणी गोमांस आढळल्यास तेथे मॉब लिचिंग केले जाते, मात्र एखाद्या महिलेवर बलात्कार झाल्यास त्या गुन्हेगारांना सोडले जाते आणि त्यांचा सत्कार देखील केला जातो, त्यांना आमदारकीचे तिकीट दिले जाते , हे आमचे हिंदुत्व नक्कीच नाही असे वक्तव्य करत ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला.
आज स्वातंत्र्य धोक्यात आलेले आहे…
ठाकरे पुढे म्हणाले, आज स्वातंत्र्य धोक्यात आलेले आहे. हे स्वातंत्र्य आबाधित राखण्यासाठी जे जे सोबत येतील आम्ही त्यांच्या सोबत जाणार आहोत. बाहेर गुलामगिरी आहे, हुकुमशाही आलेली आहे आणि आपण आत मोठ्या गोष्टी करतो आणि बाहेर शेपूट घालून चालतोय…काय उपयोग आहे त्याचा?
वंचित समाजाला उभे करण्याचे काम बाबासाहेबांनी केले. स्वातंत्र अबाधित राखण्यासाठी जे जे सोबत येतील त्यांच्यासोबत आम्ही जाणार. माणुसकी हाच खरा धर्म. घटनेचा उल्लेख केला जातो. त्यात राज्य आणि केंद्राला समान अधिकार दिल्याचे ते म्हणाले होते. दोन तीन बाबी सोडल्या तर हे अधिकार राज्यांनाही दिले आहेत. परंतू ते आज दिसत नाहीत. वाटेल त्या मार्गाने सत्ता पाहिजे, ही माणसे लायक नाहीत. ह्यांना खाली पाय ओढून खेचले पाहिजे, असेही ठाकरे म्हणाले.
देशाचा कायदा मंत्री न्यायव्यवस्थेविरोधात वक्तव्य करतो. न्यायव्यवस्था संपली आहे, पंतप्रधानांनी यापुढे न्यायाधीश नेमावेत असे भासवण्यासाठी हे केले जात आहे. मग लोकांचा विश्वास असलेली न्यायालयेच बंद करा. माझ्यावरही उद्या खटला दाखल होईल. मग किरण रिजिजू यांच्यावर का नाही? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.