BharatJodoYatraNewsUpdate : तरुणांचा विश्वासघात , व्यापार , उद्योग संकटात , राहुल गांधी यांचा मोदी सरकार आणि संघावर हल्ला बोल…

वाशीम : काँग्रेसनेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा झंजावात आता विदर्भात पोहोचल्या नंतर राहुल गांधी यांनी आपल्या शांत आणि संयमी सहलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभाराचा आणि घोषणांचा परामर्श घेतला. राहुल गांधी यांनी मोदी यांच्यावर आरोप करताना नरेंद्र मोदी यांनी , देशातील तरुणांना दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक केली. मोदी सत्तेत येऊन ८ वर्षे झाली नोकऱ्या तर दिल्या नाहीत उलट चुकीच्या पद्धतीने जीएसटी लावून व नोटबंदीने व्यापार उद्योग बंद पाडून करोडो लोकांचे रोजगार घालवले. देशातील तरुणांचे स्वप्न भंग केले, देशातील तरुण मोदींना नोकऱ्या कुठे आहेत? असा सवाल विचारत आहेत पण मोदी गप्प आहेत असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी विचारला.
वाशिमच्या चौकात झालेल्या सभेत बोलताना राहुल गांधी यांनी भाजप व मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, या सरकारने देशाचा कणा असलेल्या लघु, मध्यम, छोटे व्यापार दुकानदार यांचे व्यवसाय बंद पडले, लाखो रोजगार गेले. दोन तीन उद्योगपतींसाठी मोदी सरकार काम करत आहे. सामान्य जनतेसाठी नाही. महागाई, बेरोजगारी संपवण्यासाठी मोदी सरकार काहीही करत नाही. गॅस ४०० रुपये, पेट्रोल ७० रुपये व डिझेल ६० रुपये असताना नरेंद्र मोदी युपीए सरकारवर कठोर टीका करत होते. आता गॅस १२०० रुपये, पेट्रोल १०९ रुपये व डिझेल ९६ रुपये झाले तरी नरेंद्र मोदी एक शब्दही उच्चारत नाहीत. सामान्य जनता , शेतकरी, कष्टकरी यांचे मोदी सरकारला काहीही देणेघेणे नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
दरम्यान युपीए सरकारने शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले पण मोदी सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करत नाही. बड्या उद्योगपतींची लाखो कोटी रुपयांची कर्ज एनपीएच्या नावाखाली मात्र माफ केली जातात आणि शेतकऱ्यांना लाख दोन लाख कर्जासाठी त्रास दिला जातो. शेतमालाला एमएसपी मिळत नाही. तरुण शिक्षण घेऊन नोकरीचे स्वप्न पाहत आहे पण त्यांना नोकरी मिळत नाही. देशात हिंसा, द्वेष पसरवून समाजा-समाजात, जाती धर्मात भांडणे लावली जात आहेत. हा देश एकसंध रहावा, संविधान वाचावे, जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडावी यासाठीच ही भारत जोडो यात्रा आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.
भाजप , सरकार आणि संघावर टीका
या सभेच्या आधी बोराळा येथे बोलताना राहुल गांधी म्हणाले की , भारतातील आदिवासी, दलित, अल्पसंख्याक यांच्या हितांचे संरक्षण करण्याचे काम संविधान करते. पण या संविधानावर आक्रमण करण्याचे काम भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुरू केले आहे. शिक्षण व्यवस्था असो किंवा वैद्यकीय सेवा, सर्वच क्षेत्रांचे खासगीकरण सुरू आहे. मुलांना चांगल्या शिक्षणापासून वंचित ठेवेल जात आहे.
वाशीम जिल्ह्याच्या सीमेवर पदयात्रेचे आगमन होताच अमरावती येथील रामराज्य ढोलताशा पथकातील सदस्यांनी चाळीस ढोल वाजवून यात्रेकरूंमध्ये उत्साह निर्माण केला. कनेरगाव नाका येथे हजारो कार्यकर्ते, कला संच आणि ग्रामस्थांनी यात्रेचे स्वागत केले. बोराळा हिसे या गावानजीक थोर क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय आदिवासी काँग्रेसच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. राहुल गांधी म्हणाले, आदिवासींच्या अधिकारासाठी आदिवासींचे जननायक बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशांविरोधात मोठा संघर्ष केला. बिरसा मुंडा यांची आज १२२ वी जयंती आहे. पण त्यांच्या विचारांवरच आज आक्रमण केले जात आहे. आदिवासींना त्यांचे हक्क मिळू दिले जात नाहीत. काँग्रेस सरकारने आदिवासींच्या हिताचे निर्णय घेतले होते. वन अधिकार अधिनियम २००६ व भूमी अधिग्रहण कायदा २०१३ यातून त्यांना हक्क मिळाले होते. पण मोदी सरकार आल्यापासून हे कायदे कमजोर करण्यात आले आहेत.
भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदिवासींना जाणीवपूर्वक वनवासी संबोधते. आदिवासी ही छोटी गोष्ट नाही. आदिवासी हेच या देशाचे खरे मूळ मालक आहेत. तेच सर्वप्रथम या देशात आले होते, पण आता त्यांनाच मूलभूत हक्कांपासून वंचित केले जात आहे. आदिवासींना वनवासी संबोधून त्यांना चांगल्या शिक्षणापासून, सोयीसुविधांपासून दूर करण्याचा हा भाजपचा प्रयत्न आहे, आणि तो काँग्रेस पक्ष निश्चितपणे हाणून पाडेल, असेही राहुल म्हणाले.