Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AbdulSattarNewsUpdate : कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या घरांवर मुंबई, औरंगाबादेत दगडफेक….

Spread the love

औरंगाबाद :  कृषीमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत बोलताना सुळे त्यांचा एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह भाषेचा वापर केला आहे. सत्तारांच्या या टिप्पणीनंतर सत्तार यांच्या विरोधात राज्यात सर्वत्र संतापाची लाट पासरली असून त्यांच्या मुंबई आणि औरंगाबाद येथील घरांवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली आहे.  २४ तासाच्या आत त्यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादीच्या वतीने देण्यात आला आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचा आक्रमक पवित्रा पाहता मुंबईतील मंत्रालय परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या परिसराला छावणीचे स्वरुप आले आहे.

औरंगाबादेत दगडफेक

सत्तारांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबादेत आंदोलन केले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सत्तारांच्या औरंगाबादेतील निवासस्थानावर दगडफेक केली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच जोपर्यंत सत्तार मंत्रीपदाचा राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, अशी ठाम भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना थोपवण्याचा प्रयत्न केला. मात्र आक्रमक कार्यकर्त्यांनी पोलिसांना न जुमानता सत्तारांच्या निवासस्थानावर दगडफेक केली.

मुंबईतही घोषणा, दगडफेक

अब्दुल सत्तार यांच्या मुंबईतील घरावरही मोर्चा काढण्यात आला. यावेळी अब्दुल सत्तारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दगडफेकीत सत्तार यांच्या निवासस्थानाच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहेत. आंदोलनानंतर पोलिसांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना अटक केली.

दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रात अब्दुल सत्तार कुठेही फिरले तरी, त्यांना अशाच आक्रोशाचा सामना करावा लागेल. जर राज्य सरकारने अब्दुल सत्तार यांच्या राजीनामा घेतला नाही, तर त्यांना मंत्रालयात बसू देणार नाही. त्यामुळे अब्दुल सत्तारांनी आपले शब्द मागे घ्यावेत आणि त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.

मी कोणत्याही महिलेचा अपमान केला नाही…

राज्यभरात संतपाची लाट उसळल्यानंतर सत्तार यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की,  मी कोणत्याही महिलेचा अपमान केलेला नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच आमचे सर्व आमदार महिलांचा सन्मान करतात. तरीदेखील माझ्या वक्तव्यामुळे महिलांच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो. परंतु मी तसे कोणतेही विधान केलेले नाही, असे स्पष्टीकरण सत्तार यांनी दिले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!