AbdulSattarNewsUpdate : संतप्त मुख्यमंत्र्यांचा फोन, सत्तारांची माफी आणि आमदारांची बैठक, महिला आयोगही आक्रमक…

मुबई : कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याची राज्य महिला आयोगाने देखील गंभीर दखल घेतली असून पोलीस महासंचालकांना कायदेशीर कारवाई करण्याची सूचना करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व आमदारांना मुंबईत तातडीने हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत सत्तार यांच्या विरोधातील कारवाईची माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपमानास्पद उद्घार काढल्याची तक्रार राज्य महिला आयोगाकडे प्राप्त झाली आहे. महिलांना अपमानास्पद वागणूक देत, आक्षेपार्ह विधाने करत त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणे, कमी लेखणे, कर्तुत्वहनन करणाऱ्या अशा वक्तव्याची आयोगाने दखल घेतली आहे. याप्रकरणी राज्याचे पोलिस महासंचालकांनी कायदेशीर कारवाई करावी आणि त्याचा अहवाल तात्काळ सादर करावा असे आयोगाकडून सूचना देण्यात आली आहे.
शिंदे यांनी बोलावली आमदारांची बैठक
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येत्या दोन दिवसांमध्ये आमदार आणि प्रवक्त्यांची बैठक बोलावली असल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे. मंत्री मंडळ विस्तार आणि राज्यात निर्माण झालेली वादग्रस्त परिस्थिती या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
सत्तारांचे टोचले कान…
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्य केल्याचे वृत्त पसरताच राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून सत्तार यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. दरम्यान अब्दुल सत्तार यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतप्त झाले. याबाबत त्यांनी फोनवरून सत्तार यांचे कान टाकल्यानंतर पुन्हा एकदा माफी मागितली. परंतु इतक्यात हे वातावरण शांत होईल याची शक्यता नाही.
सत्तार यांच्या विरोधात पोलिसात तक्रार…
दरम्यान मुबईतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते इन्द्रपाल सिंग यांनी बोरिवली पोलीस ठाण्यात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी खा. सुप्रिया सुळे यांच्याविरोधात वक्तव्य करून महाराष्ट्रातील महिलांचा अवमान केला असल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा म्हणून तक्रार केली आहे.
केसरकर यांनीही मागितली माफी…
दुसरीकडे शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेनेचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनीही या प्रकरणात माफी मागितली असून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विषयी आम्हाला आदर आहे मात्र याबाबत अब्दुल सत्तार यांनीही माफी मागितली असून पक्षाच्या वतीने मी सुद्धा माफी मागत आहे त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही असेही त्यांनी म्हटले आहे.