Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : ऋतुजा लटके यांचे भवितव्य मतयंत्रात बंद, रविवारी मतमोजणी …

Spread the love

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या  पोटनिवडणुकीसाठी झालेल्या  मतदान प्रक्रियेत सुमारे ३१.७४ टक्के मतदान झाले असून सर्व प्रक्रिया शांततेत आणि सुरळीतपणे पार पडली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली आहे.


अंधेरी पूर्व या मतदारसंघातील सर्व २५६ मतदान केंद्रावर सकाळी ७ वाजतापासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीस म्हणजे सकाळी ११ वाजेपर्यंत ९.७२ टक्के मतदानाची टक्केवारी होती. दुपारी १ वाजेपर्यंत १६.८९ टक्के मतदान झाले. तर दुपारी ३ वाजेपर्यंत २२.८५ टक्के; सायंकाळी ५ वाजेपर्यंत २८.७७ टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रियेच्या अखेरीस या मतदारसंघात सुमारे ३१.७४ टक्के मतदान झाले असल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेतील बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीला महत्व आले होते परंतु अखेरच्या क्षणी भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या निवडणुकीतील चुरस निघून गेली. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान मुरजी पटेल यांनी उमेदवारी मागे घेतली असली तरी ऋतुजा लटके यांना भाजपकडून ‘नोटा’च्या माध्यमातून आव्हान दिले  जात असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू होती. या निवडणुकीत नोटाला मत द्यावे, यासाठी भाजपकडून पैशांचे  वाटप होत असल्याचा आरोपही ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. मात्र समोर तुल्यबळ प्रतिस्पर्धी उमेदवार नसल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्येही या निवडणुकीसाठी म्हणावा असा उत्साह दिसून आला नाही त्यामुळे या पोटनिवडणुकीत  मतदानाची टक्केवारी घसरल्याचे म्हटले जात आहे.

या मतांची मोजणी ही रविवार दिनांक ६ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे ६ नोव्हेंबर रोजी अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीचा निकाल नक्की काय लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!