Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaWorldNewsUpdate : बहुसंख्यांकवादाचे  राजकारण करणारांनी ऋषी सुनक यांच्या निवडीतून धडा घ्यावा : पी चिदंबरम

Spread the love

नवी दिल्ली :  ब्रिटनमधील हुजूर पक्षाचे नेते ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आल्याचे वृत्त समजताच सुनक हे भारतीय वंशाचे असल्यामुळे त्यांच्या या निवडीचे भारतातही स्वागत होत आहे. दरम्यान देशात सातत्याने बहुसंख्यांकवादाचे  राजकारण करणारांनी यातून नक्कीच काही शिकले पाहिजे असा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी दिला आहे. 


भारतीय वंशाच्या सुनक यांची ब्रिटनच्या सर्वोच्च पदी निवड झाल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम भारतातील बहुसंख्यवादाचे  राजकारण करणाऱ्या पक्षांना खोचक टोला लगावला आहे. त्यांनी एक ट्वीट करत म्हटलं, “आधी कमला हॅरिस आणि आता ऋषी सुनक… अमेरिका आणि ब्रिटनमधील नागरिकांनी त्यांच्या देशांतील बहुसंख्य नसलेल्या नागरिकांना स्वीकारले  आहे. त्यांना सरकारमधील उच्च पदावर निवडून दिले आहे. भारत आणि बहुसंख्यवादाचं राजकारण करणाऱ्या पक्षांनी यातून धडा शिकायला हवा, असे मला वाटतं.”

२०१५ पासून ब्रिटनच्या संसदेत खासदार असलेले ऋषी सुनक दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होते. याआधी जुलै महिन्यात ते लिझ ट्रस यांचे प्रतिस्पर्धी म्हणून पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरले होते. मात्र त्या निवडणुकीत लिझ ट्रस विजयी झाल्या. दरम्यान, पक्षाचा पाठिंबा गमावल्यामुळे तसेच दिलेली आश्वासने पूर्ण करू न शकल्यामुळे ट्रस यांना अवघ्या ४५ दिवसांत राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता ऋषी सुनक हे दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरले होते. यावेळी मात्र हुजूर पक्षातील खासदारांनी त्यांना पाठिंबा दिल्यामुळे त्यांनी पंतप्रधानपदाची शर्यत जिंकली आहे. ब्रिटनच्या सत्ताधारी हुजूर पक्षाने ऋषी सुनक यांची पक्षाचा नेता म्हणून निवड केली असून ते ब्रिटनचे नवे पंतप्रधान झाले आहेत. लवकरच लिझ ट्रस यांच्याकडून ते पदभार स्वीकारतील.

दरम्यान, सुनक यांची पंतप्रधानपदी निवड होताच भारतातूनही त्यांचे अभिनंदन केले जात आहे .  ज्या ब्रिटिशांनी भारतावर कित्येक वर्षे राज्य केले, आता त्याच भारतीय वंशाची व्यक्ती ब्रिटनचा कारभार पाहणार आहे, अशी भावना प्रसिद्ध लेखक चेतन भगत तसेच प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी व्यक्त केली आहे.

१६०८ साली इस्ट इंडिया कंपनी सुरतच्या बंदरावर भारतात आली. ४१४ वर्षांनंतर आता ऐन दिवाळीच्या दिवशीच ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाले आहेत. वेळेनुसार सगळं बदलत असतं. दिवाळीच्या शुभेच्छा, असे चेतन भगत म्हणाला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!