Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MCAElectionUpdate : एमसीएच्या अध्यक्षपदी पवार , शिंदे , फडणवीस पॅनलचे अमोल काळे विजयी , संदीप पाटील पराभूत

Spread the love

मुंबई : माजी कसोटीवीर संदीप पाटील यांना पराभूत करीत मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी पवार-शेलार पॅनलचे अमोल काळे विजयी झाले आहेत. यावेळी अमोल काळे यांना १८३ तर संदीप पाटील यांना १५८ मते  मिळाली आहेत. या निवडणुकीसाठी ३०० हून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान मी या पुढेही संधी मिळेल तेव्हा मुंबई क्रिकेटसाठी काम करेन अशी प्रतिक्रिया केवळ २३ मतांनी पराभूत झाल्यानंतर संदीप पाटील यांनी दिली आहे .


या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची युती झाली होती. अमोल काळे या पॅनलचे उमेदवार होते. अमोल काळे निवडून आल्यानंतर त्यांनी सर्व पॅनेलचे आभार मानले.

विजयी उमेदवार

इतर विजयी उमेदवारांमध्ये सचिव म्हणून मयंक खांडवाला निवडून आले त्यांना ३५ तर नील सावंत 20 मते मिळाली. खजिनदार म्हणून अरमान मलिक १६२ मतांनी आघाडीवर असून जगदीश आचरेकर यांना १६१ मते मिळाली आहेत. पण केवळ एका मताचा फरक असल्याने त्यांच्या मतांची पुन्हा मोजणी होणार आहे. तर गणेश अय्यर २१३ मतांसह कार्यकारिणी सदस्य म्हणून निवडून आले असून त्यांचे प्रतिस्पर्धी मलिक मर्चंट त्यांना १२३ मते मिळाली. दरम्यान या निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांची अपेक्स बॉडीमध्ये मिलिंद नार्वेकर , नीलेश भोसले, अभय हडप, समद सूरज, जितेन्द्र आव्हाड, मंगेश साटम, संदीप विचारे , प्रमोद यादव आदींचा समावेश आहे.

संदीप पाटील यांची प्रतिक्रिया

दरम्यान एका क्रिकेटरविरुद्ध निवडणुकीत सर्व राजकारणी एकत्र येतात तेव्हा कसं वाटतं? या प्रश्नाचं उत्तर देताना एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना पाटील म्हणाले की, ‘सर्व राजकारणी एकत्र आले याचा मला आनंद आहे, माझ्याविरुद्ध निवडणुकीसाठी का होईना, ते एकत्र आले हे चांगलं आहे. त्यांनी असेच एकत्र राहावे आणि मुंबई क्रिकेटसाठी चांगले काम करावे. क्रिकेट महत्त्वाचे आहे संदीप पाटील नाही.” त्यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत मुंबई क्रिकेटसाठी मी जोवर हयात आहे तोवर काम करेन असेही म्हटले आहे.


कोण आहेत अमोल काळे?

अमोल काळे हे मूळचे नागपूरचे असून मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष राहिले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अमोल काळे हे बालपणापासूनचे मित्र आहेत. एमसीए अध्यक्षपदासाठी आशिष शेलार यांनी माघार घेतल्यावर अमोल काळे नवे उमेदवार म्हणून समोर आले. त्यानंतर त्यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. त्यांचे शिक्षण नागपूर विद्यापीठात झाले असून ते बांधकाम आणि आयटी क्षेत्रातील व्यावसायिक आहेत.२०१९ मध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशच्या निवडणूकीत अमोल काळे बाळ महाडदळकर यांच्या गटाकडून उपाध्यक्ष म्हणून निवडून आले होते.

मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच एमसीएला पूर्वी बॉम्बे क्रिकेट असोसिएशन म्हणून ओळखली जात होती. ही मुंबई आणि त्याच्या आसपासच्या ठाणे आणि नवी मुंबईसारख्या क्रिकेटची प्रशासकीय संस्था आहे. एमसीएच्या कार्यक्षेत्रात पश्चिम उपनगरामधील डहाणू, मध्य उपनगरातील बदलापूर आणि खारघर तसेच नवी मुंबईचा समावेश आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!