Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad NewsUpdate : आमदार संजय सिरसाट यांना केले “एअरलिफ्ट “, प्रकृती स्थिर…

Spread the love

रक्तदाब आणि छातीत वेदना होत असल्याची होती तक्रार , प्रकृती स्थिर

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते आमदार संजय सिरसाट यांना मुंबईला “एअरलिफ्ट” करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना होत असलेला रक्तदाबाचा त्रास आणि छातीत दुखत असल्यामुळे त्यांच्यावर शहरातील एका रुग्णालयात प्राथमिक उपचार केले. त्यानंतर आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास एअर अँब्युलन्सने मुंबईला लीलावती रुग्णालयात हलविण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी विमानतळावर झाली होती परंतु आपण ठीक असल्याचे सांगून सिरसाट मुंबईला निघून गेले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.


त्यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार लिलावती रूग्णालयात ते डॉक्टरांच्या निगराणीत असून सहा तासांनंतर त्याच्यावरील पुढील उपचाराबाबत निर्णय घेण्यात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात काल पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीला ते उपस्थित होते. या ठिकाणी पालकमंत्री संदीपान भुमरे आणि नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्यासोबत  हास्यविनोदही झाले. मात्र बैठकीतच दुपारी दोनच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते बैठकीतून बाहेर पडले. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना त्रास होत असल्याने त्यांनी शहरातील सिग्मा हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासणी केली असता त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याचे निदर्शनास आले.

यावेळी डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केल्यानंतर प्रकृती स्थिर होताच मुंबईला जाण्याचा मनोदय त्यांनी डॉक्टरांजवळ बोलून दाखविला त्यानुसार आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास एअर ॲम्ब्यूलन्सने ते लिलावती रूग्णालयाकडे रवाना झाले.

यापूर्वीच त्यांच्यावर अन्जिओप्लास्टी झालेली आहे. दोन दिवसांपुर्वी ते सिग्मा रूग्णालयात रूटीन चेकअपसाठी गेले होते. डॉक्टर उन्मेश टाकळकर यांनी त्यांना दगदग न करण्याचा सल्ला दिला होता.

मुख्यमंत्र्यासोबत आज होणार होती बैठक

शहरातील काही प्रश्‍नाबाबत पालकमंत्र्यांसह शिंदे गटातील आ. प्रदिप जैस्वाल, आ. संजय शिरसाट आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार होते. याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणेही झाले होते. शहरातील बाळासाहेब ठाकरे उद्यानाचा प्रश्‍न, घाटीची नव्या इमारत, घाटीत औषधीचा तुटवडा यासह महापालिकेत अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने विकासकामांवर परिणाम होत आहे. महापालिकेला अधिकारी द्यावेत अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार होती. मात्र सिरसाट यांच्या आजारपणामुळे आजची बैठक लांबणीवर पडली आहे.

सहा तास डॉक्टरांच्या निगराणीत

याविषयी माहिती देताना “बाशि” चे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ अधिक माहिती देताना म्हणाले कि , सकाळी ७ वाजेच्या सुमारास चिकलठाणा विमानतळावरून एअर लिफ्टने मुंबईकडे रवाना झाले. तर सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी त्यांना रूग्णालयात ॲडमिट करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्यांच्यावर उपचारही सुरू करण्यात आले आहेत. ४ ते ६ तास ते डॉक्टरांच्या निगराणीखाली राहणार आहेत.

प्रकृती स्थिर आहे …

त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती देताना सिग्मा हॉस्पिटलचे डॉ . अजय रोटे म्हणाले कि , “त्यांचा रक्तदाबाचा त्रास होता. छातीमध्ये वेदना होत होत्या त्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटत होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रारही त्यांनी केली होती. त्यांना बीपी कमी करण्याची औषध देण्यात आली. तसेच त्यांची प्रकृती स्थीर करण्यासाठी आवश्यक ते उपचार करण्यात आले. मात्र त्यांची कार्डीओलॉजीकल तपासणीसाठी मुंबईला जाण्याची इच्छा होती. त्यामुळे ते मुंबईला गेले. ”

मुख्यमंत्र्यांचा सिरसाट यांना फोन …

माध्यमांच्या वृत्तानुसार स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरसाट यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. शिंदेंनीच शिरसाट यांना मुंबईत येऊन उपचार घेण्यासंदर्भात विचारणा केली. शिंदे यांनी स्वत: कार्डीओलॉजिस्ट असलेल्या डॉ. नितीन गोखले आणि डॉ. जलील पारकर यांच्यासोबत चर्चा करुन सिरसाट यांच्यावर उपचार करण्यासंदर्भात चर्चा केल्याचेही समजते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!