Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaCourtNewsUpdate : देशाच्या नव्या सरन्यायाधीशांच्या नावाची घोषणा

Spread the love

नवी दिल्ली : न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड ९ नोव्हेंबर रोजी पुढील सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील. चंद्रचूड यांची सोमवारी भारताचे ५० वे सरन्यायाधीश (CJI) म्हणून नियुक्ती करण्यात आली. केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी ही माहिती दिली. सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ दोन  वर्षांचा असेल. ते १० नोव्हेंबर २०२४ रोजी निवृत्त होणार आहेत. विद्यमान सरन्यायाधीश उदय उमेश लळित  वयाची ६५ वर्षे पूर्ण केल्यानंतर निवृत्त झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे ९ नोव्हेंबर रोजी न्यायमूर्ती चंद्रचूड सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील.

विद्यमान सरन्यायाधीश उदय उमेश लळित  यांचा ७४ दिवसांचा कार्यकाळ होता. कायदा मंत्री किरेन  रिजिजू यांनी ट्विट केले की, “राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचा वापर करून, माननीय राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश डॉ. न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांची देशाचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती ९ नोव्हेंबर २०२२ पासून लागू होईल. न्यायमूर्ती चंद्रचूड १० नोव्हेंबर २०२४ रोजी निवृत्त होतील.

भारताचे विद्यमान सरन्यायाधीश यूयू लळित यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती धनंजय वाय चंद्रचूड यांची शिफारस केली होती. न्यायमूर्ती चंद्रचूड हे अयोध्या जमीन विवाद आणि गोपनीयतेचा अधिकार यासारख्या ऐतिहासिक निकालांचा भाग आहेत.

कोण आहेत न्यायमूर्ती चंद्रचूड ?

हार्वर्ड विद्यापीठातून कायद्याच्या दोन पदव्या प्राप्त केल्यानंतर, न्यायमूर्ती चंद्रचूड यांची वयाच्या ३९ व्या वर्षी वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त करण्यात आली. ते भारतातील सर्वात तरुण वकील बनले. यानंतर लगेचच, १९९८ मध्ये त्यांना भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती देण्यात आली. वकीली करत असताना न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी ओक्लाहोमा विद्यापीठात ‘आंतरराष्ट्रीय कायदा’ विषय शिकवला. तसेच त्यांनी बॉम्बे विद्यापीठातही अध्यापक (व्हिजिटींग) म्हणून काम केलं आहे.  न्यायमूर्ती चंद्रचूड यांची २०१३ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर तीन वर्षांत त्यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली. न्यायमूर्ती चंद्रचूड हे सर्वाधिक काळ सेवा बजावलेल्या माजी सरन्यायाधीश वाय व्ही चंद्रचूड यांचे पुत्र आहेत.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!