PrakashAmbedkarNewsUpdate : अंधेरी पोट निवडणुकीबाबत प्रकाश आंबेडकरांनी मांडली “वंचित ” ची भूमिका …

यवतमाळ : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आतापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाने पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी वंचितची भूमिका स्पष्ट केली.
यवतमाळमध्ये पत्रकारांनी या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले कि , “आम्ही वेट अँड वॉच भूमिकेत आहोत. मला वाटते ही निवडणूक शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी महत्त्वाची आहे. या निवडणुकीत भाजपाचा उमेदवार आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही. आमच्याकडे कोणीही पाठिंबा मागितला नाही. त्यामुळे आम्ही कोणतीही भूमिका घेतलेली नाही.”
मी कायद्याची भूमिका मांडली…
“शिवसेनेच्या कोणत्याही गटाबाबत सकारात्मक नाही. मात्र, व्यवस्थेचा विचार केला, तर माझ्या दृष्टीने, पक्षाच्या दृष्टीने जे चुकीचे सुरू होते त्याबाबत मी माझी भूमिका मांडली. त्यात मी कायद्याची बाजू मांडली. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला अनियंत्रित अधिकार दिले, तर काय होऊ शकते याची सर्वोच्च न्यायालयानेच मांडलेली जंत्री मी लोकांसमोर मांडली,” असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, “ एखाद्या मुख्यमंत्र्याने कायदेशीर पेचप्रसंग तयार झाल्याने राजीनामा दिला, तर पुन्हा सरकार स्थापनेबाबतचा अधिकार राज्यपालांना आहे का? हा या प्रकरणातील महत्त्वाचा प्रश्न आहे. माझ्या दृष्टीने त्या काळातील संकेत महत्त्वाचे आहेत. ते संकेत सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित करण्याची गरज आहे. म्हणून आम्ही भूमिका घेतोय की, सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांच्या भूमिकेची तपासणी केली पाहिजे. मला असे दिसत होते की अनेकजण हे मानायलाच तयार नव्हते. सभापतींनी १६ जणांच्या निलंबनावरील स्थगिती उठवली की नाही याचा कोठेही खुलासा होत नाही, अशी स्थिती आहे,” असे ही आंबेडकरांनी नमूद केले.