Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ElectionNewsUpdate : भाजपकडून निवडणूक आयोगाचे स्वागत तर काँग्रेसकडून टीका …

Spread the love

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. राज्यात १२ नोव्हेंबरला मतदान होणार असून ८ डिसेंबरला निकाल लागणार आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आयोगाच्या या घोषणेचे स्वागत केले आहे. तर काँग्रेसने हिमाचल सोबत गुजरातच्या निवडणूक घोषित न केल्यामुळे निवडणूक आयोगावर टीका केली आहे.


याबाबत जेपी नड्डा यांनी आपल्या ट्विटमध्ये  लिहिले की, निवडणूक आयोगाने हिमाचल विधानसभा निवडणुकीच्या घोषणेचे मी स्वागत करतो. निवडणूक हा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आहे. देश आणि राज्याला विकासाच्या आणि सुशासनाच्या वाटेवर नेणारे हे माध्यम आहे. राज्याच्या प्रगती आणि प्रगतीला हातभार लावणारे सरकार निवडून द्या, असे आवाहन मी राज्यातील जनतेला करतो.

काँग्रेसची मात्र आयोगावर टीका

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोठमोठी आश्वासने देण्यासाठी आणि उद्घाटनासाठी अधिक वेळ मिळावा म्हणून हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या वेळापत्रकासह गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या नसल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे.


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विट केले की, “निश्चितपणे पंतप्रधानांना मोठमोठी आश्वासने देण्यासाठी आणि उद्घाटनासाठी वेळ मिळावा म्हणून हे केले गेले. हे अजिबात आश्चर्यकारक नाही.” तर काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेट यांनी दावा केला कि , “गुजरात निवडणुकीच्या तारखा दिवाळीनंतर जाहीर केल्या जातील. तोपर्यंत पंतप्रधान मोदी सरकारी खर्चाचा संपूर्ण प्रचार, तसेच रवाड्यांचे वाटप करू शकतात.

निवडणूक आयोगाने शुक्रवारी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली. या डोंगराळ राज्यात एकाच टप्प्यात १२ नोव्हेंबरला मतदान होणार असून मतमोजणी ८ डिसेंबरला होणार आहे. मात्र, आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या नाहीत. गुजरात विधानसभेचा कार्यकाळ पुढील वर्षी १८ फेब्रुवारी रोजी संपत आहे. हिमाचल प्रदेश विधानसभेचा कार्यकाळ ८ जानेवारीला संपणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!