Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : ठरलं तर …सेनेकडून ऋतुजा लटके तर भाजपकडून मुरजी पटेल भरणार उद्या उमेदवारी अर्ज …

Spread the love

मुंबई:  अखेर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने ऋतुजा लटके आणि भाजपच्या वतीने अंधेरी पूर्वच्या जागेसाठी  मुरजी पटेल आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे वृत्त आहे. भाजपकडून पटेल यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे ही जागा आता शिंदे गटाला न जाता या ठिकाणी भाजप निवडणूक लढणार  निश्चित झाल्यामुळे  शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके विरुद्ध भाजपचे मुरजी पटेल असाच हा सामना रंगणार आहे.


दरम्यान अंधेरी पूर्वची जागा शिवसेनेकडे असल्याने या जागेवर शिंदे गटाकडू दावा केला जात होता. त्यामुळे मुरजी पटेल नेमकं कुणाच्या चिन्हावर निवडणूक लढणार याबद्दल संदिग्धता होती. मात्र आज संध्याकाळी वर्षा या निवासस्थानी भाजप नेते आशिष शेलार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली. त्यामध्ये ही जागा भाजपला सोडण्यावर दोन्ही बाजूने एकमत झाले. त्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मुरजी पटेल यांना कॉल करून कमळ या चिन्हावर निवडणूक लढवण्याच्या सूचना दिल्या.

मिरवणुकीने जाऊन ऋतुजा लटके भरणार उमेदवारी अर्ज

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे ऋतुजा लटके यांचा अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणूक लढवण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार ऋतुजा लटके उद्या म्हणजेच शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता अंधेरी (पूर्व ) गुंदवली मनपा शाळेत उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्याआधी सदर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अंधेरी पूर्व गणेश मंदिर, मालपा डोंगरी येथून ९.३० वाजता त्यांची पदयात्रा निघेल.

यावेळी शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख व माजी मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना नेते व माजी मंत्री सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, कॉंग्रेस नेते व माजी मंत्री सुरेश शेट्टी, विभागप्रमुख व माजी मंत्री अॅड. अनिल परब, शिवसेना विभागप्रमुख तथा माजी मंत्री शिवसेना सचिव अनिल देसाई आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तिघांची उमेदवारी दाखल

दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या शुक्रवारी अखेरचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या जागेसाठी आजपर्यंत तीन उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. यामध्ये दोन अपक्ष उमेदवारांसह क्रांतीकारी जय हिंद सेना आणि हिंदुस्तान जनता पार्टी यांनी संयुक्तरीत्या एक उमेदवार दिला आहे. त्यामुळे अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक बहुरंगी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!