Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CyberCrimeUpdate : सावधान , “वर्क फ्रॉम होम” च्या नादात सायबर भामट्यांनी लुबाडले १० लाख ५५ हजार रुपये …

Spread the love

औरंगाबाद : व्हाॅट्सॲपवरून  वर्क फ्रॉम होम संदर्भात आलेल्या मेसेजच्या नादात आलेल्या लिंकवर  क्लिक करून सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकलेल्या तरुणाला तब्बल १० लाख ५५ हजार ५३ रुपयाला गंडवल्याचे प्रकरण सायबर ग्रामीण पोलिसांकडे दाखल झाले आहे.  व्हाॅट्सॲपवर आलेल्या लिंकवर माहिती भरल्यानंतर सायबर भामट्यांनी सांगितल्याप्रमाणे वेळोवेळी फिर्यादीने रक्कमेचा भरणा केला होता.


त्याचे झाले असे कि ,  शेंद्रा एमआयडीसीतील एका कंपनीत कार्यरत असलेल्या फिर्यादीला त्यांना ४ ऑक्टोबर रोजी अनोळखी व्हाॅट्सॲप क्रमांकावरून पार्टटाइम जॉबसाठी मेसेज आला. मेसेजमध्ये १,८०० ते १० हजार कमवा असे लिहिले होते. फिर्यादीने संबंधित व्हाॅट्सॲप नंबरवर चॅटिंग केली तेंव्हा समोरील अनोळखी व्यक्तीने जॉबसाठी आमचा टास्क पूर्ण करावा लागेल, अशी माहिती दिली आणि  त्यासाठी एक लिंकही पाठवली. त्या लिंकवर फिर्यादीने  सर्व माहिती भरली. त्यानंतर फोन पे द्वारे आरोपीने दिलेल्या युपीआय आयडीवर १०० रुपये भरले. तेव्हा फिर्यादीच्या बँक खात्यात २२८ रुपये जमा झाले.

पहिल्या ट्रान्झॅक्शननंतर फिर्यादीच्या टेलिग्रामवर लिंक मिळाली. त्यातही फिर्यादीने सर्व माहिती भरली. त्यानंतर  ५ ऑक्टोबर रोजी फिर्यादीला टेलिग्रामवर संदेश आला. त्यात एक हजार रुपये भरून तुमचा टास्क पूर्ण करा, असे सांगितले. त्यानुसार त्याने एक हजार भरल्यावर त्याच्या बँक खात्यात एक हजार ४३६ रुपये जमा झाले. त्यानंतर त्याने पुन्हा तीन हजार रुपये भरले. तेव्हा चार हजार ३९९ रुपये जमा झाले. या दोन टास्कमुळे फिर्यादीचा  विश्वास बसला आणि नंतर फिर्यादी त्यांच्या जाळ्यात आपसूकच ओढला गेला.

तब्बल २८ वेळा भरले पैसे

दरम्यान फिर्यादीने  ५ ऑक्टोबर रोजी लिंकद्वारे मिळालेल्या ‘यूपीआय’ आयडीवर स्वत: व मित्रांमार्फत वेळोवेळी पैसे भरले त्यावर दिनांक ८ ऑक्टोबर रोजी टेलिग्रामधारकाने टास्क पूर्ण झाला असल्याचा मेसेज दिला. त्यानुसार पैसे काढण्यासाठी तुमचा टास्क म्हणून दोन वेळा ९० हजार, ८५ हजार ५००, ३५ हजार, ७२ हजार, १०० आणि २०० रुपये प्राप्त यूपीआय आयडीवर पाठवले. परंतु जमा केलेली रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता ती परत मिळाली नाही.

अशा प्रकारे एकूण १० लाख ५५ हजार ५३ रुपये चार दिवसांच्या टास्कमध्ये भरण्यात आले. ते काढण्यासाठी पुन्हा ९ लाखांचा टास्क दिला. मात्र, शंका आल्यामुळे अफिर्यादीने पुन्हा पैसे भरले नाहीत. मात्र  सायबर भामट्यांनी पाठविलेल्या लिंकद्वारे फिर्यादीने यूपीआय आयडीवर तब्बल २८ वेळा पैसे पाठवले. त्यातील सुरुवातीच्या तीन वेळाच भरलेल्या पैशाला मोठ्या प्रमाणात परतावा मिळाला. त्यावरच विश्वास ठेवत फिर्यादी फसत गेला. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर क्राईम ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संतोष घुगे अधिक तपास करीत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!