Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ShivsenaNewsUpdate : निवडणूक आयोगाच्या निर्णयावर ठाकरे गटाकडून संतप्त प्रतिक्रिया ….

Spread the love

मुंबई : निवडणूक आयोगाने आपल्या तातडीच्या आदेशात शिवसेना हे पक्षाचे नाव आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह तात्पुरते गोठविण्यात येत असल्याचे म्हटले आहे . हा आदेश मिळताच शिवसेनेकडून संतप्त प्रतिक्रिया आली आहे. यावर शिंदे गटाने म्हटले आहे कि , या आदेशावर शिंदे गटाच्या नेत्यांची लवकरच बैठक घेतली जाईल तर ठाकरे गटाच्यावतीने या निर्णयाच्या विरोधात प्रतिक्रिया आल्या आहेत.


आदित्य ठाकरे यांचे ट्विट …

शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांची संतप्त प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी  “लढणार आणि जिंकणारच..!!”  असा विश्वास व्यक्त केला आहे. आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये एकनाथ शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे  की,

‘खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवेसना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. ‘ लढणार आणि जिंकणारच! आम्ही सत्याच्या बाजूने! सत्यमेव जयते! असेही आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.


हा धक्कादायक निर्णय – चंद्रकांत खैरे

“आम्हाला याचं मोठं दु:ख झालं आहे. हा निर्णय धक्कादायक आहे. शिवसैनिकांसाठी हे फारच क्लेषदायक आहे. मराठी माणसांसाठी आणि हिंदुत्वासाठी हे धोकादायक आहे. गद्दारांचं हे पाप कधीही धुतलं जाणार नाही. बाळासाहेबांनी कष्टाने उभा केलेल्या शिवसेनेची अवस्था ही गद्दारांनी केली आहे. आदरणीय प्रबोधनकार यांनी दिलेलं नाव शिवसेना हे पवित्र नाव शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मोठ्या कष्टाने जपलं. उद्धवजी ठाकरे यांनी हा वारसा समर्थपणे पुढे चालू ठेवला. आज नतद्रष्ट लोकांनी पक्ष आणि चिन्ह संपविण्याचे पाप केले आहे, गद्दार लोकं हे पाप कधीच फेडू शकणार नाही. आज मात्र मनाला खूप दुःख झालं आहे. मातोश्री आणि ठाकरे कुटुंब हे आमचं हृदयस्थान आहे.”


निवडणूक आयोगावर टीका…

निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर खासदार अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला असून त्यांनी म्हटले आहे कि , ईडी, सीबीआयसारख्या देशातील स्वायत्त संस्था वेठबिगार झाल्याचे संपूर्ण देशाने पाहिले होते. आता निवडणूक आगोय ही स्वायत्त संस्था देखील विठबिगार झाली आहे. बापाचं नाव बापच असतं, निवडणूक आयोग आमचा बाप नाही, ते तर वेठबिगार असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.

छाननी न करता दिलेला निर्णय…

“निवडणूक आयोगाकडे अर्ज केल्यानंतर कोणीतरी तक्रार केली. परंतु, आयोगाने त्याची छाननी केली नाही. शिवाय आम्ही उत्तर दिलेलं त्याची देखील छाननी करण्यात आली नाही. छाननी न करताच अवघ्या चार तासात निर्णय दिला आहे. निवडणूक आयोग कोणाच्या आदेशावर चालत आहे? असा प्रश्न अरविंद सावंत यांनी उपस्थित केला आहे. देश हुकमशाहीकडे चाललाय. छाननी न करता दिलेला निर्णय हा देशाच्या संविधानावर घाव घालणारा निर्णय आहे. शिवाय हा धक्कादायक निर्णय आहे, असे देखील सावंत यांनी म्हटलं आहे.

“लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या जनतेच्या पाठीत सुरा खूपण्याचं काम केलं जातंय. भाजपचे अनेक लोक न्यायालयाचा आणि निवडणूक आयोगाचा निर्णय येण्याआधीच शिंदेची शिवसेना खरी असल्याचे सांगत होते. त्यातच आता निवडूक आयोगाने हा निर्णय दिलाय. त्यामुळे निवडणूक आयोगावर संशय निर्माण होत आहे. संपूर्ण महाराष्ट्र हे सर्व डोळे उघडे ठेवून पाहत आहे. जेवढा आम्हाला त्रास दिला जाईल तेवढी बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना बळकट होईल, असा अविश्वास अरविंद सावंत यांनी यावेळी व्यक्त केलाय.

आमचं चिन्ह उद्धव बाळासाहेब ठाकरे …

दरम्यान उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये ‘आमचे चिन्ह….उद्धव बाळासाहेब ठाकरे,’ म्हटले असून त्यांच्या या पोस्टला शिवसैनिकांचाही जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!