Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : दहीहंडी फोडताना गंभीर जखमी झालेला गोविंदा, प्रथमेशचे निधन …

Spread the love

मुंबई : कोरोनाच्या साथी नंतर पहिल्यांदाच गणेशोत्सव , दही हंडी , दसरा , गरबा दांडियासारखे सण प्रचंड जल्लोषात साजरे करण्यात आले परंतु या दरम्यान गणेश विसर्जनाबरोबरच दहीहंडीच्या वेळी काही दुर्घटनाही घडल्या. याच दरम्यान घाटकोपर परिसरात दहीहंडी फोडण्यासाठी रचलेले थर कोसळून गंभीर जखमी झालेला गोविंदा प्रथमेश सावंतचे शनिवारी केईएम रुग्णालयात हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. तो २० वर्षांचा होता. साधारण दीड महिन्यांहून अधिक काळ त्याची रुग्णालयात मृत्युशी झुंज सुरू होती. अखेर शनिवारी त्याची प्राणज्योत मालवली. बारावीत शिकणारा अनाथ प्रथमेश प्रचंड मेहनती होता.


दहिकाल्याच्या दिवशी १९ ऑगस्ट रोजी करीरोड येथील साईभक्त गोविंदा पथक घाटकोपर येथे दहीहंडी फोडण्यासाठी गेले होते. दरम्यान घाटकोपरमध्ये दहीहंडी फोडण्यासाठी रचलेला थर कोसळला आणि थरात उभा असलेला प्रथमेश गंभीर जखमी झाला. प्रथमेशला तातडीने  रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. तेव्हापासून ते रुग्णालयात मृत्युशी झुंज देत होता. अखेर शनिवारी त्याची प्राणज्योत मालवली. रुग्णालयात दाखल असताना साईभक्त गोविंदा पथकातील काही युवक त्याची सुश्रुशा करीत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याच्यावरील उपचारासाठी पाच लाख रुपये मदत म्हणून दिले होते. तसेच माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे डॉक्टर प्रथमेशच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन होते. काही गोविंदा पथकांनीही त्याला आर्थिक मदत केली होती.

प्रथमेशच्या दुःखाची अधिक किनार अशी कि , लहानपणीच त्याच्या आई-वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्याच्या बहिणीचेही निधन झाले. त्यानंतर अनाथ झालेल्या प्रथमेशचा त्याच्या काका-काकीने त्याचा सांभाळ केला. परळ येथील एम. डी. महाविद्यालयात इयत्ता १२ वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रथमेश औद्योगिक शिक्षण घेत होता. सकाळी वृत्तपत्र वाटप करून झाल्यानंतर तो महाविद्यालयात जायचा. त्यानंतर सायंकाळी खाद्यपदार्थ डिलिवरीचे काम तो करायचा.

राज्य शासनाने यंदा दहिहंडीसह सर्वच सण , उत्सव  निर्बंधमुक्त केल्यामुळे उत्साही वातावरणात साजऱ्या झालेल्या दहीहंडी उत्सवात थर रचताना जखमी होऊन एकूण आतापर्यंत तीन गोविंदांचा मृत्यू झाला. दहीहंडी फोडण्याचा सराव करताना भांडूपमधील प्रथमेश परब जखमी झाला होता. त्यातच त्याचे निधन झाले. त्यानंतर थर कोसळून विद्याविहार येथील गोविंदा संदेश दळवी गंभीर जखमी झाला होता. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. संदेशचा २२ ऑगस्टला मृत्यू झाला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!