Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ShivsenaNewsUpdate : धनुष्य बाण कुणाचा ? निवडणूक आयोगासमोर आज काय झाले ?

Spread the love

नवी दिल्ली : मूळ शिवसेनेवर हक्क कुणाचा आणि पक्षाचे अधिकृत “धनुष्यबाण” हे चिन्ह कुणाचे याचा फैसला सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगावर सोडला आहे . आज याची सुनावणी होणार अपेक्षित असताना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुदत वाढवून देण्याची मागणी केली तर शिंदे गटाने तत्काळ निर्णयाची मागणी केली परंतु आयोगाने दोन्हीही बाजू लक्षात घेऊन  उद्धव ठाकरे यांच्या गटाला कागदपत्र आणि बाजू मांडण्यासाठी उद्या दुपारी २ वाजेपर्यंतची वेळ वाढवून देण्यात आली आहे.


शिंदे आणि त्यांच्या गटाने आधीच स्वेच्छेने पक्ष सोडला आहे….

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षावर आपला अधिकार असल्याचा दावा करत शुक्रवारी निवडणूक आयोगात उत्तर दाखल केले. या प्रतिक्रियेत उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या इतर बंडखोर आमदारांनी आधीच स्वेच्छेने पक्ष सोडला आहे. अशा स्थितीत पक्षाच्या चिन्हाबाबत ते आपल्या हक्काबाबत बोलू शकत नाहीत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव गटानेही पक्षाचे ५ लाखांहून अधिक पदाधिकारी आणि सदस्यांच्या पाठिंब्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. ठाकरे  गटाच्या वकिलांचे म्हणणे आहे की आत्तापर्यंत अडीच लाख  प्रतिज्ञापत्रे प्राप्त झाले आहेत तर आणखी ३ लाख प्रतिज्ञापत्रे मुंबईतील सेना भवनात तयार केली जात आहेत. या सर्वांची नोंद पुढील आठवड्यापर्यंत करण्याचे नियोजन आहे.

दरम्यान अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून पक्षाचे अधिकृत चिन्ह आमच्या गटाला द्यावे अथवा  ते गोठवण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना कागदपत्र सादर करण्यासाठी ७ ऑक्टोबरची मुदत दिली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांना कागदपत्र सादर करण्यासाठी उद्या दुपारपर्यंतची वेळ वाढवून देण्यात आली आहे. शिवसेनेकडून निवडणूक आयोगासमोर राष्ट्रीय कार्यकारिणीतील १८० सदस्यांचे  प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येणार आहे.  शिवसेना उद्धव ठाकरेंसोबत असलेले आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची प्रतिज्ञापत्र देखील सादर केली जाणार आहे.


दरम्यान आपल्या बाजूने  ४० आमदार, १२ खासदार, १४४ पदाधिकारी, ११ राज्यप्रमुख असल्याचा दावा शिंदे गटाने  आयोगासमोर केलेला आहे. सोबतच १ लाख ६६ हजार ७६४ प्राथमिक सदस्यत्वांची शपथपत्रंही सादर करण्यात आली आहेत. तर उद्धव ठाकरे यांच्या वतीने १० लाख सदस्यांचे प्रतिज्ञापत्र देण्यात येत असल्याचे वृत्त आहे.

अंधेरी पूर्वच्या पोट  निवडणुकीसाठी चिन्ह महत्वाचे …

शिवसेनेचे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश लटके यांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे ती जागा रिक्त झाली असून हि जागा भरण्यासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पोट निवडणुकीसाठी शिवसेनेने रमेश लटकेंच्या पत्नीला उमेदवारी जाहीर केली आहे. तर भाजपकडून या जागेसाठी मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. चिन्हाच्या अडचणीमुळे शिंदे गट भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. मात्र, शिवसेनेला धनुष्य बाण चिन्ह मिळू नये म्हणून शिंदे गट प्रयत्नशील आहे. त्यामुळे त्यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेत, एक तर धनुष्यबाण हे चिन्ह आम्हाला मिळावे किंवा ते गोठवले जावे, अशी भूमिका घेतली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!