Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ShivsenaNewsUpdate : चर्चेतली बातमी : आवाज कुणाचा : मुंबईत वाजणार आज शिवसेनेचे दोन भोंगे …

Spread the love

मुंबई : शिवसेनेच्या स्थापनेच्या ५६ वर्षांनंतर प्रथमच बुधवारी मुंबईत पक्षातील दोन प्रतिस्पर्धी गटांच्या नेतृत्वाखाली दोन दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या काही आमदारांनी बंड केल्यानंतर राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे (एमव्हीए) सरकार जूनमध्ये पडले, तेव्हापासून पक्ष दोन गटात विभागला गेला आहे.


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पूर्वसुरी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईत या दोन रॅलींचे आयोजन करण्यात आले असून, त्यानिमित्ताने शिवाजी पार्क आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे शहर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. दोन्ही प्रतिस्पर्धी शिवसेना गटांच्या समर्थकांना त्यांच्या दसरा मेळाव्यात नेण्यासाठी पाच हजारांहून अधिक बस, अनेक छोटी पर्यटक वाहने, कार आणि एक विशेष ट्रेन तैनात करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्यात सरकार बदलल्यानंतर दोन्ही गटांकडून याकडे शक्तीप्रदर्शन म्हणून पाहिले जात आहे. ठाकरे आणि एकनाथ शिंदे अनुक्रमे शिवाजी पार्क आणि एमएमआरडीए मैदानावर स्वतंत्र सभांना संबोधित करणार आहेत.

बाळासाहेब ठाकरे यांनी सुरु केली होती परंपरा…

दरम्यान दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श आपण पुढे नेत असल्याचा दावा दोन्ही गटांकडून केला जात आहे. शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात ज्वलंत भाषणे देण्यासाठी बाळासाहेबांची ओळख होती. २०१२ मध्ये त्यांचे निधन झाल्यापासून त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे या वार्षिक सभेला संबोधित करत आहेत. कोविड-१९ या जागतिक महामारीशी संबंधित निर्बंधांमुळे दोन वर्षांनंतर शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित केला जात आहे. दरम्यान आपली रॅली यशस्वी होईल असा दावा दोन्ही गटांनी  केला आहे. दोन्हीही गटाच्या नेत्यांनी  मंगळवारी तयारीचा आढावा घेतला.

सर्वत्र कडेकोट बंदोबस्त …

रॅलीच्या पार्श्वभूमीवर अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत किंवा वाहनांच्या वाहतुकीसाठी मार्ग बदलण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, दुर्गा देवीच्या मूर्तीच्या विसर्जन सोहळ्यासाठी ३२०० अधिकारी, १५२०० पोलिस, १५०० राज्य राखीव पोलिस दलाचे कर्मचारी, १००० होमगार्ड कर्मचारी, २० जलद प्रतिसाद पथके आणि १५ बॉम्बविरोधी पथके. बुधवारी तैनात करण्यात आले आहेत.

मध्य महाराष्ट्रातील नांदेड शहरातून शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाकडून दसरा मेळाव्यासाठी एक ट्रेन ‘बुकिंग’ करण्यात आली आहे, जी बुधवारी दुपारी मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर पोहोचेल, असे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. शिंदे गटाने किमान तीन हजार खासगी बस, सुमारे चार हजार पर्यटक ‘कॅब’ची व्यवस्था केली आहे.

तर रॅलीतील सहभागींना शिवाजी पार्कवर आणण्यासाठी ठाकरे गटाने ७०० बसेसचे ‘बुकिंग’ केले आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे पार्किंगसाठी आवश्यक व्यवस्था केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!