Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CongressNewsUpdate : अध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यासाठी मुकुल वासनिक अधिक सक्रिय …

Spread the love

नवी दिल्ली : राजस्थान काँग्रेसमधील गदारोळ सुरू असतानाच, पक्षाचे हायकमांड मुकुल वासनिक यांना अध्यक्ष पदाच्या शर्यतीसाठी उमेदवार बनविण्याचा विचार करू शकते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुकुल वासनिक यांच्या नावाची घोषणा होण्यापूर्वी त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्नही सुरू झाले आहेत. मुकुल वासनिक हे काँग्रेसच्या G-23 नेत्यांच्या गटात आहेत ज्यांनी पक्षातील मुख्य बदलांबाबत सोनिया गांधींना पत्र लिहिले होते. विशेष म्हणजे राहुल गांधी यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे दीपक बाबरीया यांना बदलून वासनिक यांना मध्य प्रदेशाची जबाबदारी देण्यात आली असल्याने त्यांचे पक्षातील महत्व वाढले आहे.


विशेष म्हणजे या पदासाठी आघाडीचे मानले जाणारे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ही निवडणूक न लढवण्याची घोषणा केल्यानंतर अध्यक्षपदासाठी मुकुल वासनिक यांचे नाव पुढे येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान काँग्रेसचे आमदार ज्या प्रकारे पक्ष हायकमांडच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून रविवारी विधीमंडळ पक्षाच्या बैठकीपासून दूर राहिले, त्यामुळे गांधी कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. आपल्या आदेशाचा हा अवमान असल्याची त्यांची भावना झाली असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान या निवडणुकीसंदर्भात वासनिक यांनी एके अँटनी यांची यापूर्वीच भेट घेतली असून लवकरच ते अशोक गेहलोत यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. त्याचवेळी शशी थरूर आणि दिग्विजय सिंह यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत आपली नावे आधीच जाहीर केली आहेत. या निवडणुकीसाठी हे दोन्ही नेते शुक्रवारी आपले अर्जही भरू शकतात.

राजस्थानबद्दल येत्या दोन दिवसात होईल निर्णय …

काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, पक्षाध्यक्ष सोनिया गांधी येत्या एक-दोन दिवसांत राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतील.  याआधी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सोनियांची भेट घेऊन जयपूरमध्ये काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक होऊ न शकल्याने त्यांची माफी मागितली होती. यापुढे अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी ‘१० जनपथ’ येथे भेट घेतल्यानंतर गेहलोत म्हणाले की, आपण मुख्यमंत्रीपदी राहायचे की नाही याचा निर्णय सोनिया गांधी घेतील.


अशोक गेहलोत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मी गेली ५० वर्षे काँग्रेसचा निष्ठावान सैनिक आहे… दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले. यामुळे मला ज्या वेदना होत आहेत त्या फक्त मीच जणू शकतो. मला मुख्यमंत्रीपदी राहायचे आहे, असा संदेश देशभर गेला आहे, त्यामुळे हे सर्व घडत आहे हे माझ्यासाठी अधिक वाईट आहे.

गेहलोत पुढे  म्हणाले, “एक ओळीचा ठराव संमत करण्याची आमची परंपरा आहे. दुर्दैवाने तसा ठराव मंजूर होऊ शकला नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. मी मुख्यमंत्री आणि विधिमंडळ पक्षाचा नेता  असूनही हा ठराव मंजूर होऊ शकला नाही याचे मला नेहमीच दुःख असेल. त्याबद्दल मी सोनियाजींची माफी मागितली आहे.” ते म्हणाले, “या वातावरणात मी आता निवडणूक लढवणार नाही असा निर्णय घेतला आहे. हा माझा निर्णय आहे.” मात्र असे असले तरी राजस्थानमधील राजकीय संकटाची छाया काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर पडली आहे हे नक्की.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!