Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PoliticalCrisisinRajasthan : राजस्थानात काय चाललंय ? सरकार टिकवण्याचे काँग्रेससमोर मोठे आव्हान …

Spread the love

जयपूर : एकीकडे काँग्रेसनेते भारत जोडीच्या निमित्ताने काँग्रेसला बळ देण्याचा प्रयत्न करीत आहेत तर दुसरीकडे त्यांना पक्षांतर्गत बंडाळीचा सामना करावा लागत आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक संध्याकाळी सात वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी होणार होती. मात्र बैठकीपूर्वीच गेहलोत यांचे निष्ठावंत मानले जाणारे आमदार संसदीय कामकाज मंत्री शांती धारिवाल यांच्या बंगल्यावर जमू लागले. येथून रात्री साडेआठ वाजता ते विधानसभा अध्यक्ष डॉ.जोशी यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि मध्यरात्रीपर्यंत तेथेच थांबले.


प्रत्यक्षात या आमदारांनी विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. राज्य विधानसभेतील मुख्य व्हीप महेश जोशी यांनी रविवारी रात्री उशिरा सांगितले की, “आम्ही राजीनामा दिला आहे आणि आता पुढे काय करायचे ते सभापतीच ठरवतील. गेहलोत यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या आमदारांच्या दोन अटी आहेत. प्रथम, मुख्यमंत्र्यांचा उत्तराधिकारी असा असावा ज्याने २०२० मधील राजकीय संकटाच्या वेळी सरकारला वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती, ती पाडण्याच्या प्रयत्नात सामील असलेला कोणी नसावा. दुसरे म्हणजे, काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक होईपर्यंत त्यांना काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक नको आहे.

१०० आमदारांनी राजीनामे दिल्याचा दावा

दरम्यान आपत्ती व्यवस्थापन आणि मदत मंत्री गोविंद राम मेघवाल यांनी पत्रकारांना सांगितले की, “आम्ही नुकतेच आमचे राजीनामे सादर केले आहेत.” किती आमदारांनी राजीनामे दिले, असे विचारले असता ते म्हणाले, “सुमारे १०० आमदारांनी राजीनामे दिले आहेत मात्र सगळं ठीक आहे.”

काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत गेहलोत यांचा उत्तराधिकारी निवडण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर राजधानी जयपूरमध्ये हा सर्व घडामोडी घडल्या. या परिस्थितीमुळे मुख्यमंत्री आणि सचिन पायलट यांच्यातील सत्तासंघर्ष अधिक तीव्र झाल्याचे संकेत मिळत आहेत. 


यापूर्वी मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे दिल्लीचे निरीक्षक मल्लिकार्जुन खरगे आणि अजय माकन ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलमध्ये गेले होते. या नेत्यांमध्ये प्रदीर्घ बैठक झाली. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलटही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले, आणखी काही आमदारही विधीमंडळ पक्षाच्या प्रस्तावित बैठकीत सहभागी होण्यासाठी आले होते, मात्र ही बैठक झालीच नाही.

दरम्यान, निरीक्षक मल्लिकार्जुन खरगे आणि अजय माकन यांना सोनिया गांधी यांनी आमदारांची एक-एक भेट घेण्याचे आदेश दिले आहेत. आशा आहे की ही बैठक आज होईल. २०० सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसचे १०७ आमदार आहेत. पक्षाला अपक्ष आमदारांचाही पाठिंबा आहे.

भाजपची टीका

राजस्थानमधील ताज्या राजकीय घडामोडींदरम्यान, भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षाचे उपनेते राजेंद्र राठोड यांनी रविवारी रात्री सांगितले की, राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने निर्देश करत आहे.

दरम्यान  गेहलोत यांचे म्हणणे आहे की त्यांच्या हातात काहीच नाही कारण आमदार नाराज आहेत आणि मुख्यमंत्रिपदासाठी पायलटला पाठिंबा देण्यास तयार नाहीत. २०० सदस्यांच्या राजस्थान विधानसभेत काँग्रेसचे १०७ आमदार असून १३अपक्षांचा पाठिंबा आहे. यातील बहुतांश अपक्ष माजी काँग्रेसचे आहेत जे गेहलोत यांना पाठिंबा देतात. काल संध्याकाळी हे आमदारही धारिवाल यांच्या निवासस्थानी हजर होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!