Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra Political Update : राज्यातील १७५ ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसचा विजय; भाजपाचा दावा खोटा : नाना पटोले 

Spread the love

मुंबई : राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत भारतीय जनता पक्ष खोटी माहिती देऊन विजयाचा दावा करत आहे तो चुकीचा आहे. काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना या निवडणुकीत घवघवीत मिळाले असून काँग्रेस पक्षाला १७५ ग्रामपंचायतींमध्ये घवघवीत विजय मिळाला आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुक निकालावर भाजपाचा आयटी सेल चुकीची माहिती देत आहे आणि त्यावर भाजपा मोठ्या विजयाचा दावा करत आहे तो धादांत खोटा आहे. सर्वात जास्त जागा जिंकल्याचा दावा करून भाजपा स्वतःच स्वतःची पाठ थोपटवून घेत आहे. आम्ही सर्व जिल्ह्यातून माहिती घेतली असताना काँग्रेस पक्षाला घवघवित यश मिळालेले स्पष्ट दिसत आहे. काँग्रेस पक्षावर लोकांचा विश्वास आहे तो त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत दाखवून दिला आहे. ग्रामपंचायत निवडणूक ही पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नाही असेही पटोले म्हणाले.

जनतेची दिशाभूल…

वेदांता फॉक्सकॉन प्रकरणी शिंदे-फडणवीस सरकार जनतेची दिशाभूल करत आहे. गुजरात काय पाकिस्तान आहे का? असे म्हणून महाराष्ट्रातून गुजरातमध्ये प्रकल्प गेल्याचे ते समर्थन करताना दिसत आहेत. गुजरातमध्ये गुंतवणूक होत असेल तर त्याला कोणाचाच विरोध नाही पण महाराष्ट्रात होणारा हा प्रकल्प गुजरातच्या घशात घातला आहे. अशा प्रकारे महाराष्ट्र कमकुवत करून गुजरातच्या विकासाला हातभार लावला जात असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. या प्रकल्पासाठी महाविकास आघाडी सरकारकडून वीजबिल, पाणी, जमीन यासह अनेक बाबतीत सवलतींचे मोठे पॅकेज दिलेले होते. महाराष्ट्र हे गुंतवणुकीसाठी उद्योगांची पहिली पसंदी आहे. महाराष्ट्र २०१४-१९ या काळातही देशात गुंतवणुकीत अग्रेसर होता आणि आजही आहे ही केंद्र सरकारची आकडेवारीच सांगते असेही नाना पटोले यांनी सांगितले.

प्रत्येक जिल्ह्यात ‘संविधान बचाव रॅली’

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारीपासून भारत जोडो यात्रा सुरु करण्यात आली असून या यात्रेला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेप्रमाणेच संविधान बचाव रॅली प्रत्येक जिल्ह्यात काढली जाणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अनुसुचित जाती विभागाचे अध्यक्ष राजेश लिलोठीया यांनी दिली.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसुचित जाती विभागाच्या नवनियुक्त कार्यकारिणीची बैठक एससी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश लिलोठीया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत ते बोलत होते. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले होते. माजी मंत्री वर्षा गायकवाड, बैठकीला महाराष्ट्र एससी विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी संपतकुमार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्याने उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी देशाला दिलेले संविधान भाजपा व आरएसएसला मान्य नाही. संविधान संपुष्टात आणण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून केले जात आहे. संविधानातील सेक्युलर व सोशलिस्ट शब्द काढण्यासाठी याचिकाही दाखल केलेली आहे. देशातील मुस्लीम समाजाला मतदानाचा अधिकार काढून घेण्याचाही त्यांचा डाव आहे पण भाजपा व संघ परिवाराचा हा डाव हाणून पाडण्यासाठी काँग्रेसच्या वतीने संविधान रक्षकाची भूमिका घेतली जाणार आहे. संविधान कमजोर करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही खंबीरपणे उभे राहू असेही लिलोठीया म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!