Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : औरंगाबादेत क्रीडा विद्यापीठ , मराठवाडा मुक्तीदिनी मुख्यमंत्र्यांची घोषणा ….

Spread the love

औरंगाबाद : मराठवाडा ही पवित्र भूमी असून येथे संतांचे संस्कार, मेहनती तरुण, वाढणारे उद्योग, यासह पर्यटनाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. येथील विकासाचे प्रश्न सोडविण्यसाठी आम्ही कटीबद्ध असून विविध विकास कामांसाठी शासन भरीव निधी उपलब्ध करुन देत आहे. तसेच या सर्व कामांचा यापुढे मंत्रालय स्तरावरुन नियमित आढावा घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठी विविध विकास कामांच्या घोषणाही मुख्यमंत्र्यांनी आज केल्या.


यावेळी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मराठवाडा मुक्तिसंग्रामातील इतिहासावर आधारित कॉफी टेबल बुक, लोगो आणि डॉ. लक्ष्मीकांत तांबोळी यांच्या गितांची ध्वनिमुद्रिका, तसेच मंगला बोरकर यांच्या ‘संघर्ष मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा’ या पुस्तकाचे प्रकाशनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत यशस्वी कामगिरी केल्याबद्दल अविनाश साबळे या क्रिडापटुला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तीस लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.

मराठवाड्याच्या विकासासाठी अनेक घोषणा

औरंगाबाद जिल्हा : श्री क्षेत्र घृष्णेश्वर मंदीर, वेरुळ परिसराचा विकास, औरंगाबाद ते अहमदनगर रेल्वे मार्गासाठी भूसंदपादन, क्रीडा विद्यापीठाची स्थापना, पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा विकास, शहराच्या जून्या पाणी पुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन, समृध्दी महामार्गाने शिर्डी येथे जाण्यासाठी १७ कि.मी. पोच मार्गाची दर्जोन्नती. विश्वास नगर, लेबर कॉलनी येथे जिल्हाधिकारी कार्यालय संकूल व प्रशासकीय इमारतीचे बांधकाम. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे नूतनीकरण. मराठवाडा वाटर ग्रीड मध्ये नांदूर मधमेश्वर प्रकल्पातील ४ धरणांचा समावेश करून बंद पाईपलाईनव्दारे पाणी उपलब्ध करणार मध्य गोदावरी उपखो-यात ४४ प्रकल्पांना शासन मान्यता शनिदेव उच्च पातळी बंधा-याच्या कामास मान्यता.जायकवाडी धरणाच्या कालव्याची व वितरीकांची दुरुस्ती, म्हैसमाळ येथे तारांगण बांधकाम व अनुषंगीक कामे, पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्यात वळविणे. म्हैसमाळ येथील गिरीजामाता मंदीर भाविक व पर्यटकांसाठी भौतिक सुविधा, वेरुळ येथे अभ्यागत केंद्रामधील बाह्य वळण रस्त्याचे बांधकाम व सुशोभिकरण सुलिभंजन येथील दत्त धाम ते परियोका तालाब पर्यटन सुविधा.


जालना जिल्हा : अंबड येथे भूयारी गटार योजना, श्रीक्षेत्र राजूर गणपती मंदीर परिसराचा विकास, बदनापूर येथे नवीन बसस्थानक, जालना शहराच्या पाणी पुरवठा योजनेचे नुतनीकरण, जाफ्राबाद शहरासाठी पाणीपुरवठा योजनेस मंजूरी, अंबड येथील मत्स्योदरी देवी संस्थान परिसराचा विकास.

परभणी जिल्हा : शहरासाठी पाणी पुरवठा योजना, शहरासाठी भुयारी गटार योजना, गटार योजनेच्या मल शुध्दीकरण केंद्रासाठी कृषी विद्यापीठाची जागा, स्त्री रुग्णालयासाठी निधी, वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी जागा, छत्रपती शिवाजी महाराज (नाना-नानी) उद्यानाचे आधुनिकीकरण व सुशोभिकरण, जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामासाठी कृषी विद्यापीठाची जमीन, धारासूर येथील गुप्तेश्वर या प्राचीन मंदीराच्या विकासासाठी निधी, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, परभणी गोरक्षण ट्रस्ट, परभणी यांच्या मालकीची जागा विविध विकासकामांसाठी जिल्हाधिकारी यांचेकडे वर्ग करणार.

हिंगोली जिल्हा : श्रीक्षेत्र औंढा नागनाथ मंदीर परिसराच्या विकास, हळद संशोधन व प्रक्रिया केंद्रासाठी जागा, श्रीसंत नामदेव मंदीर संस्थान परिसराचा विकास, कुरुंदा (ता. वसमत) येथे पूर प्रतिबंधक कामे.

नांदेड जिल्हा : जिल्हा क्रीडा संकुलासाठी जागा, नांदेड महानगरपालिकेच्या घन कचरा व्यवस्थापनासाठी निधी, घनकचरा प्रकल्पांतर्गत बायोमायनिंग प्रक्रीया प्रकल्प, नांदेड शहरातील भूयारी गटार योजना.

बीड जिल्हा : जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय इमारतीचे काम.

लातूर जिल्हा : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बांधकामासाठी कृषी महाविद्यालयाची जागा, विमानतळाच्या अतिरिक्त भूसंपादनासाठी निधी, रस्त्यांच्या दुरुस्ती व डांबरीकरणासाठी निधी, जिल्हाधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत व नियोजन भवन इमारतीचे काम, मराठवाडा वॉटर ग्रीड मधून लातूर जिल्हा व शहरासाठी प्रकल्प, लातूर, बीड व उस्मानाबाद जिल्हयातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील पाणी टंचाई निवारणासाठी यशवंत सागर जलाशय उजनी येथून ११२ द.ल.घ.मी. पाणी केंद्र शासनाच्या मदतीने उपलब्ध करणे, तावरजा मध्यम प्रकल्पाची दुरुस्ती, महावितरणच्या ओव्हर हेड डिस्ट्रीब्युशन नेटवर्कचे भूमीगत वितरण केबल नेटवर्कचे काम, चाकूर येथे औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्यासाठी जमीन संपादन.

उस्मानाबाद जिल्हा : वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कार्यान्वित करणे, दुष्काळग्रस्त मराठवाडयासाठी पाणी उपलब्ध होण्यासाठी नदीजोड प्रकल्प,श्री तुळजाभवानी मंदीर व परिसराचा विकास.

या कार्यक्रमास केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सर्वश्री हरिभाऊ बागडे, संजय शिरसाट, अभिमन्यु पवार, प्रशांत बंब, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जून प्रसन्ना, पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता, महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जीएसटीचे सहआयुक्त जी. श्रीकांत, सिडकोच्या प्रशासक दीपा मुधोळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटने यांच्यासह, अधिकारी, कर्मचारी, नागरिक यांची उपस्थिती होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!