Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharshtraNewsUpdate : अतिवृष्टी,पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना ३,५०१ कोटींंची मदत जाहीर …

Spread the love

मुंबई : राज्य सरकारने अतिवृष्टी,पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना ३,५०१ कोटींंची मदत वितरित करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या नुकसानीची राज्य आपत्ती प्रतिसाद निधीपेक्षा वाढीव दराने मदत दिली जाणार आहे.


या निर्णयानुसार जिरायत शेतीला १३,६००रु, बागायत शेतीला २७ हजार तर बहुवार्षिक शेतीला ३६ हजार रुपये मिळणार आहे. राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे एकूण २३ लाख ८१ हजार ९२० हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. यामध्ये राज्यातील २५ लाख ९३ हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे.  राज्य आपत्ती प्रतिसाद निधीपेक्षा वाढीव दराने शेतकऱ्यांना हि मदत केली जाणार आहे.

मदत व पुनर्वसन विभागाकडून आपदग्रस्त शेतक-यांना मंजूर मदत तातडीने वितरीत करण्याचा आदेश  काढण्यात आला आहे. दरम्यान नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधितांच्या मदतीत वाढ करण्याचा निर्णय सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला होता. त्यानुसार जिरायत शेतीसाठी पूर्वीचा दर प्रति हेक्टरी ६८०० वरून वाढवून प्रति हेक्टरी १३ हजार ६०० रुपये,बागायत शेतीसाठी प्रति हेक्टरी १३ हजार ५०० रूपयांवरन २७ हजार रुपये आणि बहुवार्षिक शेतीसाठी पूर्वीचा दर १८ हजार रूपयांवरून ३६ हजार रुपये करण्यात आला आहे. जिरायत, बागायत व बहुवार्षिक पिकांच्या बाबतीत यापूर्वी दोन हेक्टरच्या मर्यादेत वाढ करून प्रती तीन हेक्टर अशी वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.

दरम्यान शेतक-यांसाठीचा मदतीचा निधी संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिका-यांकडे वर्ग करण्यात आला आहे. ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ऑनलाइन पद्धतीने जमा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.याबाबतचा शासन निर्णय महसूल व वन विभागाकडून  ८ सप्टेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!