ShivsenaNewsUpdate : मोठी बातमी : शिवसेनेच्या याचिकांच्या सुनावणीसाठी अखेर घटनापीठाची स्थापना , गुरुवारी सुनावणी …

मुंबई : सर्वोच्च न्यायालयातील शिवसेनेच्या सर्व याचिकांच्या सुनावणीसाठी अखेर घटनापीठाची स्थापना करण्यात आली असून पुढील सुनावणी गुरुवारी २५ ऑगस्टला घटनापीठासमोरच होणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. आजच्या सुनावणीनुसार सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एन व्ही रमणा यांनी या सर्व याचिका ५ न्यायधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग केल्या आहेत. राजकीय पक्षातील अंतर्गत लोकशाही आणि त्यात निवडणूक आयोगाची भूमिका या मुद्यांवर घटनापीठ सुनावणी करणार आहे.
दरम्यान या सुनावणीच्या वेळी निवडणूक आयोगाने तूर्त कोणताही निर्णय घेऊ नये, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. याआधीही न्यायालयाच्या निरीक्षणाआधी निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या चिन्हाबाबत कुठलाही मोठा निर्णय घेऊ नये, हे न्यायमूर्ती रमणा यांनी सांगितले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना याबाबत दिलासा मिळाला आहे.
उद्धव ठाकरे गटाला दिलासा
सर्वोच्च न्यायालयाने आजच्या सुनावणीत एक महत्त्वाचा आदेश दिला आहे की परवाच्या म्हणजेच गुरुवारच्या सुनावणीपर्यंत निवडणूक आयोगाने कुठलीही कारवाई करु नये. त्यामुळे हा उद्धव ठाकरे गटासाठी दिलासा असेल. उद्धव ठाकरे गटाला निवडणूक आयोगाकडे त्यांचं म्हणणे मांडायला आज अंतिम मुदत होती. दरम्यान पक्षाच्या चिन्हाबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला असतील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.