IndiaNewsUpdate : मनुस्मृतीबाबत “हे” काय बोलल्या जस्टीस प्रतिभा सिंह …?

नवी दिल्ली : मनुस्मृती सारख्या वादग्रस्त पौराणिक , वैदिक धर्म ग्रंथाने महिलांना नेहमीच आदराचे आणि सन्मानाचे स्थान दिले असल्याचे विधान दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती प्रतिभा एम सिंह यांनी केले आहे. इतकेच नव्हे तर या न्यायमूर्ती महोदयांनी मनुस्मृतीमध्ये महिलांच्या सन्मानाचा मुद्दा असल्याचा दावा केला आहे. यावरून देशात वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जस्टीस प्रतिभा सिंह यांनी मनुस्मृतीच्या विशेष सकारात्मक पैलूवर बोलताना म्हटले आहे की, मनुस्मृतीचा आदर कसा करायचा हे आपल्या पूर्वजांना चांगलेच ठाऊक होते, मनुस्मृतीसारख्या वैदिक धर्मग्रंथाने महिलांना नेहमीच आदराचे स्थान दिले आहे. बुधवारी आयोजित ‘विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योजकता आणि गणितातील महिलांसमोरील आव्हाने’ या परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले.
भारतात जन्माला येणे महिलांसाठी भाग्याचे…
न्यायमूर्ती सिंह आपल्या भाषणात म्हणाल्या कि , ‘मनुस्मृतीमध्ये असे म्हटले आहे की, जर तुम्ही महिलांचा आदर आणि सन्मान केला नाही तर तुम्ही केलेल्या सर्व पूजेला काही अर्थ उरणार नाही. भारतासारखा देश महिलांच्या नेतृत्वाच्या भूमिकेत प्रगतीशील आहे आणि हे आपले भाग्य आहे. त्या पुढे असेही म्हणाल्या कि , ‘मी असे म्हणत नाही की, खालच्या स्तरावर महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराकडे आणि वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष केले पाहिजे, पण हो, वरच्या स्तरावर, मध्यम स्तरावर आपणास स्त्रिया पुढे जाताना दिसत आहेत.
महिलांसाठी अनुकूल सिस्टीम असावी …
सिंह पुढे म्हणाल्या कि, महिलांसाठी अनेक मंच आहेत, जिथे ज्येष्ठ आणि नवोदित महिला वकील यांच्यात नियमित संवाद साधला जातो. आम्ही तरुणांना कायद्याच्या क्षेत्रात येण्यासाठी आणि न्यायालयीन प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करतो. अर्थात हे फक्त महिलांच्या सक्षमीकरणाबद्दल मी बोलत नाही तर महिलांना पुढे येण्यासाठी अनुकूल सिस्टीम असावी. ज्यामुळे महिला पुढे येऊन त्यांची शैक्षणिक पात्रता संपादन करून देशाच्या प्रगतीत योगदान देऊ शकतील.’