ShivsenaNewsUpdate : शिवसेनेला संपविण्याचा प्रयत्न , बंड थंड करण्याची माझ्याकडे ताकद…

मुंबई : बंडखोर शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात चांगलेच शाब्दिक युद्ध होत आहे. बंडखोर गटाकडून स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , दीपक केसरकर , संजय सिरसाट, अब्दुल सत्तर तोफ डागत आहेत तर शिवसेनेच्या वतीने स्वतः उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अधिक आक्रमक झाले आहेत.
बंडखोरांवर टीकास्त्र सोडताना उद्धव ठाकरे यांनी , शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न सुरु आहेत असा पुनरुच्चार करीत मातोश्रीवर जळगावच्या शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलेल्या विधानावर बोट ठेवलं. जे पी नड्डा यांनी शिवसेना संपण्याच्या मार्गावर असल्याचं विधान केलं आहे. राजकारणात विजय आणि पराभव होत असतो, पण आता संपवण्याची भाषा केली जात आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. अनेक आव्हानं पायदळी तुडवत आम्ही झेंडा रोवला आहे असंही यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले कि , “दोन ते तीन पातळीवर आपली लढाई सुरु आहे. रस्त्यावरील लढाईत आपण काही कमी पडणार नाही. कोर्टातही सुनावणी सुरु आहे. तिसऱी लढाई म्हणजे शपथपत्र आणि सदस्य नोंदणी आहे. विषय गंभीर असून अर्ध्यात सोडू नका” . न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे असंही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान “आजपर्यंत अनेकदा शिवसेना फोडण्याचे प्रयत्न झाले, पण आता संपवण्याचे प्रयत्न सुरु आहेत,” असं सांगत उद्धव ठाकरेंनी जे पी नड्डा यांच्या वक्तव्यावर टीका केली. बंड याआधीही झाले असून मी त्यांना सामोरं गेलो आहे. हे बंड थंड करण्याची ताकद माझ्याकडे आहे. पण आता राजकारणात तुम्हाला मुळापासून संपवण्याचा डाव आखला जात आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.