Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ShivsenaNewsUpdate : संजय राऊत यांच्याविषयी मला अभिमान : उद्धव ठाकरे

Spread the love

नवी दिल्ली : भाजपाचे राजकारण अतिशय घृणास्पद आणि निर्घृण असल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज एका पत्रकार परिषदेत बोलताना केला. “संजय राऊत माझे मित्र आहेत आणि बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांचा मला अभिमान आहे. त्यांचा गुन्हा काय होता? झुकेगा नहीं हे सिनेमात बोलणे  खूप सोपे  असते  पण संजय राऊतांनी ते सिद्ध करुन दाखवले  आहे. हुकूमशाहीसमोर न झुकता लढू शकतो ही एक ठिणगी संजय राऊतांनी टाकली आहे”, असे  उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने  अटक केल्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी राऊतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काल बिहारच्या पाटणामध्ये केलेल्या भाषणातील मुद्दे मांडून उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली.

ते पुढे म्हणाले कि , “देशात आता प्रादेशिक पक्ष शिल्लक राहिलेले नाहीत असे  जेपी नड्डा बोलले यातूनच त्यांना देशात काय करायचे  आहे हे लक्षात येतं. देशात भाजपा हा एकमेव पक्ष राहणार आहे असे  ते म्हणाले हे विधान अत्यंत गंभीर आहे. त्यांच्या विधानात लोकशाही कुठे आहे का? राजकारण एक बुद्धीबळ असल्याचं आपण म्हणतो. पण यांच्याकडून फक्त बळाचा वापर केला जात आहे. बुद्धीचा वापर आता केला जात नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा दिवस फिरले तर तुमचं काय होईल याचा विचार जेपी नड्डा यांनी करावा”, असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.

भाजपाचा वंश कुठून सुरू झाला?

जेपी नड्डा यांनी देशातील सर्व पक्षात वंशवाद सुरू असल्याचं म्हटलं. पण त्यासोबतच विविध पक्षात बरीच वर्ष काम केलेले लोक आज भाजपामध्ये येत आहेत असंही ते म्हणाले. मग भाजपाचा वंश नेमका कुठून सुरू झाला? हे त्यांनी ठरवावं. भाजपाकडून सुरू असलेलं राजकारण घृणास्पद स्वरुपाचं आहे. बळाचा वापर करुन प्रादेशिक पक्षातील नेत्यांना फोडायचं आणि गुलामासारखं वागवायचं. सगळे पक्ष संपतील किंवा आम्ही संपवू असा जेपी नड्डा यांच्या भाषणाचा कंसातील अर्थ आहे. त्यामुळे लोकांनी आता वेळ जाण्याच्या आधी विचार करण्याची वेळ आली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

देशात सध्या हिटलरशाहीचे राजकारण सुरू आहे…

भाजपविरोधात लढण्यासाठी कोणत्याच पक्ष उरलेला नाही. जे संपले नाही ते पक्ष संपतील आणि आता फक्त आपण टिकणार आहे. त्यांचं वक्तव्य हे देशाला हुकुमशाहीकडे नेणारं आहे. देशात सध्या हिटलशाही सुरू आहे. बाळासाहेबांनी मला एक सांगितले , जेव्हा दुसरे महायुद्ध पेटले होते, हिटलर जिंकणार अशी शक्यता होती. डेव्हिड लो एक व्यंगचित्र काढायचे, त्यावेळी तो नामहोर व्हायचा, त्यामुळे हिटलरने त्याला घेऊन येण्याचे सांगितले होते. आता देशात तसंच सुरू आहे. बळजबरीने त्याला घेऊन यायचे. देशात सध्या हिटलरशाहीचे राजकारण सुरू आहे’ असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

‘राजकारण आता घृणास्पद झाले आहे. आता दिलदारपणा उरला नाही. तुम्ही तुमचे विचार मांडा, त्यांचे मुद्दे मांडतील. जो निर्णय जनतेला घेता येईल. काँग्रेसने ६० ते ६५ वर्ष राज्य केलं. पण आज त्यांची परिस्थिती पाहिली तर मोठ्या बढाया मारण्याची गरज नाही’ असंही ठाकरे म्हणाले.

एकदा सत्तेचा फेस निघाला की यांना कळेल…

‘मी मुख्यमंत्री होतो पण माझ्या डोक्यात हवा गेली नाही, त्यामुळे जे मुख्यमंत्री झाले आहेत , त्यांनी डोक्यात हवा जाऊ देऊ नये, निर्घृणपणे वागू नका, दिवस आणि काळ सगळ्यांसाठी हे सारखेच असतात असं नाही. जेव्हा काळ बदलतो तेव्हा तो काळ तुमच्याशी दृष्टपणाने वागेल, ही वेळ येऊ देऊ नका. एकदा सत्तेचा फेस निघाला की यांना कळेल, असा सल्लावजा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!